fbpx

‘सर्दी, तापाची लक्षणे २४ तासापेक्षा अधिक राहिल्यास स्वाईन फ्ल्यु प्रतिबंधक औषधोपचार सुरु करा’

नाशिक : सर्दी, तापाची लक्षणे २४ तासापेक्षा अधिक राहिल्यास स्वाईन फ्ल्यु प्रतिबंधक औषधोपचार सुरु करावेत असे दिले निर्देश आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. साथीच्या रोगांना आळा घालण्यासाठी जनजागृती आवश्यक असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. नाशिक दौऱ्यात स्वाईन फ्ल्यू, डेंग्यू या रोगांबाबत तातडीची घेतली आढावा बैठक यावेळी ते बोलत होते.

सर्दी ,खोकला आणि तापाची लक्षणे २४ तासापेक्षा जास्त काळ राहिल्यास स्वाईन फ्ल्यु प्रतिबंधक औषधोपचार सुरु करावेत, साथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी शहरातील संवेदनशील व ग्रामीण भागात जनजागृती करावी, अशा सूचना नाशिक महानगरपालिका येथील स्थायी समिती सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या साथीच्या रोगाबाबत आढावा बैठकीत दिल्या गेल्या . स्वाईन फ्ल्युबाबत प्रत्येक नागरिकाने आपल्या स्तरावर काळजी घेणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे खासगी रुग्णालयांनी व वैद्यकीय महाविद्यालयांनी तात्काळ उपचारासाठी सहकार्य करावे, असे आवाहन या बैठकीद्वारे केले.

केंद्र शासनाच्या धर्तीवर सुरु करण्यात आलेला ‘आपला दवाखाना ’ नाशिकमध्ये लवकर सुरु करण्यात येणार असून आरोग्य विभागातील रिक्त असलेली पदेही लवकर भरण्यात येतील असे यावेळी नमूद करीत रुग्णांचे सर्वेक्षण, निदान, उपचार, आरोग्य शिक्षण, प्रशिक्षण इत्यादी बाबीकडे लक्ष देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. प्रत्येक आरोग्य केंद्रात स्वाईन फ्ल्यूसाठी लागणाऱ्या औषधांचा व नाशिक शहर व ग्रामीण भागातील डेंग्यू परिस्थितीचा आढावा सदर बैठकीत घेण्यात आला. डेंग्यू व स्वाईन फ्ल्यु संदर्भातील मार्गदर्शक सूचना सर्व शासकीय व खासगी रुग्णालयात ठळकपणे प्रदर्शित करण्याबाबत देखील अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

याप्रसंगी नाशिक महानगरपालिका महापौर सौ.रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, आरोग्य सहसंचालक डॉ.सतिश पवार, संचालक डॉ.अर्चना पाटील, उपसंचालक (आरोग्य) डॉ.रत्ना रावखंडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, आदी उपस्थित होते.