गुवाहाटी : गेले तीन दिवस राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. शिवसेनेतील अंतर्गत मतभेदामुळे महाराष्ट्राचं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे. जवळपास ४६ आमदारांचा एकनाथ शिंदेंना पाठिंबा आहे. या सर्व घडामोडी घडत असताना आता एकनाथ शिंदे गटातील एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओने मोठी खळबळ उडाली आहे.
या व्हिडिओमध्ये एकनाथ शिंदे हे आपल्या आमदारांशी चर्चा करताना दिसत आहेत. आपण भाजपसोबत जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केल्याचं या व्हिडिओतुन समोर आला आहे. तसेच भाजप आपल्या निर्णयाला काही कमी पडू देणार नाही, त्यांनी पाकिस्तानला धडा शिकवलाय. आपल्या सर्वांचं सुखदु:ख एकच आहे. असं या व्हिडिओतून बोलताना दिसत आहे. बंडखोर आमदारांनी आमचे नेते म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड केलेली आहे, असं देखील व्हिडिओतून बोलल्याचं निदर्शनास येत आहे.
दरम्यान, आज माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले कि, राज्याचे मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना आमचा खंबीर पाठिंबा आहे. शेवटपर्यंत संघर्ष करत राहू, असं ते म्हणालेत. तसेच पुढे आम्ही सरकार टिकण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. मी दुपारी मुख्यमंत्र्यांशी बोललो. आताही बोललो. यापेक्षा दुसरी कोणतीही भूमिका राष्ट्रवादीची नाही. ही आमची अधिकृत भूमिका असेल. प्रसारमाध्यमांनी इतर कोणत्याही वृत्तवर विश्वास ठेवू नये. शिवसेनेबाबत जे काही निर्माण झालं आहे ते त्यांचे प्रवक्ते सांगतील, असं अजित पवार म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या :