एकनाथ खडसेंचा मुख्यमंत्र्यांना थेट सवाल!

सरकार आरोप करणाऱ्यांवर कारवाई का करत नाही

मुंबई: प्रशांत परिचारक यांच्या निलंबनावरून रणकंदन माजले असतांना. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी त्यांच्यावरच्या आरोपांबाबत सरकारला जाब विचारला आहे. खडसे यांच्यावर पुण्यातील भोसरी येथील जमीन स्वस्तात लाटल्याचा आरोप झाला. याप्रकरणी त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. तेव्हापासून ते भाजपवर नाराज आहेत. त्यामुळे सभागृहात आणि सभागृहाबाहेरही ते पक्ष आणि नेतृत्वावर निशाणा साधतात.

खडसे म्हणाले ‘आपल्यावर झालेल्या एकाही आरोपात तथ्य निघालेलं नाही, मग आता सरकार त्या आरोप करणाऱ्यांवर कारवाई का करत नाही?’, असा थेट सवाल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारला आहे. खडसे यांनी विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यावर झालेला पक्षपातीपणाचा आरोप या मुद्द्यांबरोबरच त्यांच्यावर झालेल्या आरोपाचा मुद्दा देखील उपस्थित केला. ‘बेछूट आरोप झाल्यानंतर ज्याप्रकारे चौकशी केली जाते, त्याचप्रमाणे त्यात काहीही आढळलं नाही. तर आरोप करणाऱ्यांवर तातडीची कारवाई झाली पाहिजे.’ असं खडसे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनीही लगेच खडसेंच्या सवालावर सभागृहातच उत्तर दिलं. ‘तथ्यहीन आरोप करुन लोकप्रतिनिधींची बदनामी करणाऱ्यांवर काय कारवाई करता येऊ शकेल याबाबत नियम तपासले जातील.’ असे मुख्यमंत्री म्हणाले.