अशा मंत्री पदावर मी लाथ मारतो ;एकनाथ खडसे

khadase

पुणे :माझ्यावर अचानक आरोप झाले आणि तब्बल एक वर्षाच्या काळात माझ्या अनेक चौकश्या झाल्या, तो वाईट काळ मी अनुभविला.  गेले २ महिने मी मरणापेक्षा वाईट मरण अनुभवले. अशा मंत्रिपदावर मी लाथ मारतो या शब्दात माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे आपल्या मनातील खदखद व्यक्त केली .

न-हे मानाजीनगर येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटस्च्या २२ व्या वर्धापनदिनानिमित्त प्रा.डॉ.सुधाकर जाधवर शैक्षणिक संकुलात सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यंदाचा जीवनगौरव पुरस्कार एकनाथ खडसे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी जनता दल (यु) चे मुख्य महासचिव व राष्ट्रीय प्रवक्ता तसेच राज्यसभेचे माजी खासदार के.सी.त्यागी, आमदार भीमराव तापकीर, संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ.सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष  शार्दुल जाधवर आदी उपस्थित होते. जाधवर करंडक स्पर्धेपासून सुरु झालेल्या विविध उपक्रमांचा समारोप वर्धापनदिनाच्या मुख्य कार्यक्रमाने झाला.दरम्यान यावेळी भाषण करताना खडसे यांनी चौफेर फटकेबाजी केली तसेच दोन महिन्यांपासून चौकशी आणि आरोपांचे जे त्यांच्यामागे  शुक्लकाष्ठ सुरु आहे त्यावर देखील भाष्य केले.

काय म्हणाले नाथाभाऊ? 

माझ्या ४० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत मी ८ मुख्यमंत्री पाहिले. अनेक खात्यांवरील विविध पदे भूषविली. मंत्रीपद असो वा नसो सतत काम करीत राहिलो. परंतु  गेले २ महिने मी मरणापेक्षा वाईट मरण अनुभवले. अशा मंत्रिपदावर मी लाथ मारतो .जे आरोप करण्यात आले त्यात  कोणतेही तथ्य नसल्याने काहीच सापडले नाही. त्यामुळे आता मी पुढील आरोपांची वाट पहात आहे, कारण त्यामध्ये देखील काही आढळणार नाही.

आणखी वाचा आता नवीन आरोप होण्याची वाट पाहत आहे: एकनाथ खडसे 

जनतेच्या प्रेमापोटी मी राजकारणात जीवंत असून यापुढेही जनतेची सेवा करणार आहे. त्यामुळे मी ज्याप्रमाणे संघर्षमय जीवन जगत राजकारणाचा प्रवास केला, तसा विद्यार्थ्यांनीही जीवनात संघर्ष करायला हवा, असे प्रतिपादन राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केले. जीवनगौरव पुरस्कार म्हणजे त्या क्षेत्रातून निवृत्ती असे अनेकांना वाटते. मात्र, हा पुरस्कार म्हणजे माझी निवृत्ती नसून नवी सुरुवात आहे. इतरांनी यामाध्यमातून माझ्या चांगल्या कामाचे मूल्यमापन केले असल्याने कष्टाचे फलित झाल्यासारखे वाटते.

त्याकाळी प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाने व कष्टाने भाजपाचे सरकार आत्ता सत्तेत आले. आज गोपीनाथ मुंडे असते, तर राज्याच्या राजकारणाची दिशा बदलली असती.  राजकारणात चांगल्या प्रवृत्ती व विचार येत नाहीत, तोपर्यंत स्वच्छ राजकारण होणार नाही. राजकारणात शब्दावर पक्के न राहणारे अनेक लोक मी अनुभविले आहेत.

रोहिंग्या मुस्लिमांच्या मुद्द्यावर देखील त्यांनी यावेळी भाष्य केले  सध्या हिंदुस्थान हा एकमेव देश असा आहे की, ज्याची धर्मशाळा झाली आहे. बाहेरील देशातून येथे अनेकजण येतात, त्यांना नागरिकत्त्व दिले जाते. तेच लोक आपल्या येथे बॉम्ब टाकतात. त्यामुळे अशांची  देशाबाहेर हाकलपट्टी करायला हवी असे मत देखील त्यांनी व्यक्त केले . शिवाय ‘इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा’ या घोषणेचा देखील खडसे यांनी पुनरुच्चार केला .