एकनाथ खडसेंना साईबाबा सद्बुद्धी देवो- सुधीर मुनगंटीवार

सुधीर मुनगंटीवार यांनी नाव न घेता खडसेंना लगावला टोला

शिर्डी: माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी मंत्रालयात उंदीर घोटाळा झाल्याचा आरोप सभागृहात केला होता. या संदर्भात बोलतांना राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एक टॅबलेट ठेवली म्हणजे एक उंदीर मेला पाहिजे असा अर्थ काढणे चुकीचे आहे. अर्थ काढायचाच असेल तर अर्थ काढावा. यासाठी साईबाबा सद्बुद्धी देवो.’ असा  टोला त्यांनी एकनाथ खडसेंना लगावला आहे. मुनगंटीवार यांनी आज रामनवमी उत्सवाच्या पहिल्या दिवशी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.  दरम्यान ‘ शिर्डीमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, फाईल्सची काळजी घेण्यासाठी औषध ठेवले गेले पण याचा अर्थ प्रत्येक गोळी खाऊन उंदीर मेलाच असा अर्थ काढू नये. आधीच जनतेचा व्यवस्थेवरचा विश्वास कमी झाला आहे आणि असे वक्तव्य करून विश्वास अजून कमी करू नका. काँग्रेस राष्ट्रवादीच्या धोरणांमुळे राज्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. मात्र आम्ही तो डोंगर कमी करण्यात यशस्वी झालो आहे. महसुली तुटीत सुद्धा आम्ही ऋनभार कमी केला आहे.

काय म्हणाले होते एकनाथ खडसे?

माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. खडसे म्हणाले, मंत्रालयात ३ लाख १९ हजार ४०० उंदीर मारण्याचा कॉन्ट्रॅक्ट एका कंपनीला देण्यात आला होता. ६ महिन्यांत सर्व उंदरांचं निर्मूलन करण्याचं ठरलं होतं. मात्र ७ दिवसांतच सर्व उंदीर मारले असल्याचं सांगण्यात आलं. दिवसाला ४५ हजार उंदीर मारल्याचे सांगितले. मात्र या उंदरांची विल्हेवाट कशी आणि कुठे लावली याची काही माहिती दिली नाही. तसेच त्या कंपनीकडे विष हाताळण्याचा परवानाही नव्हता.