सरकारकडून आचारसंहितेचा भंग; शेतकऱ्यांना शासकीय नुकसानभरपाई देण्याचा प्रयत्न – नवाब मलिक

मुंबई – भंडारा-गोंदियामध्ये पोटनिवडणूकीची आचारसंहिता सुरु असतानाही शासकीय नुकसानभरपाई देण्याचा प्रयत्न संबंधित यंत्रणेकडून केला जात असून हा आचारसंहितेचा भंग आहे. भाजप नुकसानभरपाईच्या शासकीय कार्यवाहीच्या आडून मतदानावर परिणाम करण्यासाठी राजकीय खेळी करत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

भंडारा-गोंदियामधील शेतकऱ्यांच्या शेतीवर सहा महिन्यापूर्वी तुडतुडयांचा प्रार्दुभाव झाला होता. याबाबत विरोधकांनी विधानसभेत नुकसानभरपाई देण्याची मागणी केल्यानंतर ही नुकसान भरपाई देण्याचे सरकारने मान्य केले होते. मात्र सहा महिने उलटून गेले तरी ही नुकसान भरपाई देण्यात आली नव्हती मात्र सरकारकडून भंडारा-गोंदिया निवडणूक कालावधीत अचानक या नुकसान भरपाईची रक्कम ट्रेझरीमध्ये जमा करण्यात आली असून ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे.

हा प्रकार आचारसंहितेचा भंग करणारा आहे. याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असून याची तात्काळ दखल घेवून कारवाई करत स्थगिती दयावी अशी मागणी करतानाच जर कारवाई झाली नाही तर आम्हाला न्यायालयात दाद मागावी लागेल आणि या विषयावर जनआंदोलन उभारावे लागेल असा इशारा नवाब मलिक यांनी दिला आहे.

You might also like
Comments
Loading...