वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरण कर्मचाऱ्यांनी प्रयत्नांची शर्थ

mahavitaran

औरंंगाबाद : धुवांधार पावसाने मंगळवारी रात्री शहराला चांगलेच झोडपून काढले. धुवांदार पावसामुळे काही ठिकाणी विद्युत वाहिन्यांवर झाडे कोसळून तसेच बिघाड होऊन वीजपुरवठा खंडित झाला. खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरण कर्मचा-यांनी प्रयत्नांची शर्थ केली असल्याची माहिती महावितरणच्या सुत्रांनी दिली.

मंगळवारी सायंकाळी आलेल्या धुवांदार पावसाने औरंगाबाद शहराला चांगलेच झोडपून काढले. जवळपास दोन तास झालेल्या पावसामुळे महावितरणची सिडको, सूतगिरणी, शिवाजीनगर, पन्नालालनगर, छावणी, समाधान कॉलनी, पॉवर हाऊस, बायजीपुरा व रोशनगेट ही ३३ केव्ही उपकेंद्रे बंद पडली होती. तसेच ब्रिजवाडी, टाऊन सेंटर, चिकलठाणा एमआयडीसी परिसरातही बिघाड झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरणचे अभियंते व कर्मचा-यांनी तातडीने बिघाड शोधण्याचे काम हाती घेऊन दुरुस्ती करण्यास सुरूवात केली. वरून कोसळणाऱ्या पावसात महावितरणचे अधिकारी व कर्मचारी बिघाड शोधुन वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी रस्त्यावर उतरल्याने अनेक उपकेंद्रे अवघ्या सव्वा तासांत सुरु झाली.

जोरदार पावसामुळे विद्युत वाहिन्यांवर झाडे कोसळल्यामुळे खंडीत झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणच्या कर्मचा-यांनी तातडीने विद्युत वाहिन्यांवर पडलेली झाडे दुर करून दुरूस्तीचे काम हाती घेतले होते. रात्री उशिरापर्यंत दुरूस्तीचे काम सुरू होते. महावितरणच्या कर्मचा-यांनी प्रयत्नांची शर्थ केल्यामुळे काळोखात बुडालेल्या शहराला काळोखातून बाहेर काढण्यात महावितरणच्या अभियंते व कर्मचा-यांना यश आले असल्याचे महावितरणच्या सुत्रांनी कळविले आहे. महावितरणच्या कर्मचा-यांनी बुधवार-गुरुवार रोजी देखील शहराच्या विविध भागात विद्युत वाहिनीवर आलेल्या झाडाच्या फांद्या तोडण्याचे काम हाती घेत विजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न केले असल्याचे सुत्रांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या