बौद्ध धर्म उन्नत जीवन शैलीचा प्रभावी मार्ग – महिंद्रा राजपक्षे

महिंद्रा राजपक्षे

औरंगाबाद : मैत्री आणि संयमाची शिकवणूक देणारा बौद्ध धर्म हा भारत देशाची जगाला महत्त्वपूर्ण देण असून उन्नत जीवन शैलीचा बौद्ध धर्म हा प्रभावी मार्ग असल्याचे प्रतिपादन श्रीलंकेचे माजी राष्ट्राध्यक्ष महिंद्रा राजपक्षे यांनी केले. जाबींदा इस्टेट येथे धम्मयान एज्युकेशनल ॲन्ड चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने आयोजित दुसऱ्या आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट फेस्टीव्हल -२०१७ येथे प्रमुख अतिथी म्हणून श्री. राजपक्षे बोलत होते.

श्री.राजपक्षे म्हणाले की, जागतिक स्तरावर सौहार्दाचे वातावरण टिकविण्यासाठी आणि शांततापूर्ण मानवी जीवनासाठी बौद्ध धर्म सर्वार्थाने उपयुक्त असून तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेली शिकवण ही सार्वकालिक आहे. जी आजच्या काळासोबतच भविष्यकाळातही मानवजातीला दिशादर्शक ठरणारी आहे. श्रीलंकेमध्ये विविध धर्माचे नागरिक एकोप्याने राहत असून मौर्य काळापासून सम्राट अशोकांनी केलेल्या धर्मप्रसारामुळे बौद्ध धर्माची तत्वे श्रीलंकेने स्विकारलेली आहेत. श्रीलंकेच्या सामाजिक, राजकीय वाटचालीमध्ये बौद्ध धर्माच्या तत्वांचा प्रभाव महत्वपूर्ण आहे. श्रीलंकेसाठी भारताची ओळख हा गौतम बुद्धांचा देश अशी असून बौद्ध तत्वांचे मूळ ग्रंथ संकलन असलेले त्रिपीटक हे श्रीलंकेने जतन केलेले आहे. अशा पद्धतीने भारत -श्रीलंका संबंधांना सांस्कृतिक, धार्मिक आणि ऐतिहासिक ऋणानुबंधाची पार्श्वभूमी आहे. या आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट फेस्टीव्हलमुळे भारताचे इतर बुद्धिस्ट देशांसोबतचे नातेसंबंध वृद्धिंगत होण्यास निश्चितच चालना मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

 Loading…
Loading...