भारतीय भाषा शिकविण्यासाठी लॅपटॉपचा प्रभावी वापर

marathi-language

पुणे : भारतीय भाषा टिकविणे आजच्या काळात अत्यंत गरजेचे झाले आहे. आज जर आपण यावर मेहनत घेतली नाही. तर येत्या 10 वर्षात मराठीची अवस्था संस्कृत भाषेसारखी होऊ शकते. लहान मुलांना अतिशय सहज आणि सोप्या पद्धतीने भारतीय भाषा शिकविण्यासाठी संगणक हे उत्कृष्ट माध्यम आहे. या माध्यमातून अल्पावधीतच आपण लहान मुलांना भारतीय भाषांचे प्रशिक्षण देऊ शकतो. त्यामुळे भारतीय भाषा लहान मुलांना शिकविण्यासाठी लॅपटॉपचा प्रभावी वापर करावा, असे मत माजी सनदी अधिकारी लीना मेहेंदळे यांनी व्यक्त केले.भगिनी निवेदिता प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्ष लीलाताई शिंत्रे यांच्या प्रथम स्मृति प्रीत्यर्थ, संस्थेतर्फे ‘स्मृतिसुगंध’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी संस्थेतील भगिनींना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी संस्थेकडून दरवर्षी देण्यात येणारा सरस्वती समाजसेवा पुरस्कार व गौरवपत्राचे पुणे विद्यापीठ कुलसचिव प्रा. डॉ. अरविंद शाळीग्राम यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. संस्थेच्या अध्यक्षा सुलभा देऊस्कर तसेच संस्थेच्या सर्व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.सन 2016-17 यावर्षासाठीचा सरस्वती समाजसेवा पुरस्कार गोंदिया जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या दोन हजार पेक्षा अधिक मुलांना दत्तक घेऊन त्यांचे संगोपन व सांभाळ करणा-या हिंजवडी माण गाव येथील समाजसेविका पूजा बोडके यांना देण्यात आला. इन्स्टिट्यूट ऑफ योगाची स्थापना करून त्याद्वारे समाजात योग साधनेचा प्रचार आणि प्रसार कार्य करणा-या विदूला शेंडे यांना गौरवपत्र प्रदान करून त्यांच्या कार्याचा संस्थेतर्फे गौरव करण्यात आला. त्याचबरोबर संस्थेच्या अर्चना अढागळे यांचा यावर्षीच्या कार्यकुशल कर्मचारी म्हणून प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला.