शिक्षण संस्थांनी जागतिक दर्जाशी स्पर्धा करतील असे विद्यार्थी घडवावेत – अजित पवार
पुणे : माहिती तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षण क्षेत्रात तीव्र स्पर्धा असून काळाची गरज लक्षात घेता शिक्षण संस्थांनी जागतिक दर्जाशी स्पर्धा करतील असे विद्यार्थी घडवावेत, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. सभेला आमदार अशोक पवार, माजी आमदार विलास लांडे, उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव ॲड. संदीप कदम यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी होते.
पवार म्हणाले, पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. ही ओळख आपण जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विद्यार्थांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देत सर्वांगीण विकास होईल यासाठी सतत नावीन्यपूर्ण प्रयोग करावेत. आजच्या युगात बुद्धीला आणि गुणवत्तेला महत्व आहे. शाळेचा दर्जा व पायाभूत सुविधा चांगल्या असल्यास त्या शाळेत विद्यार्थी व पालकांचा शिक्षण घेण्याकडे कल असतो.अशा सुविधादेखील उपलब्ध करून द्याव्या लागतील.
प्रास्ताविकात ॲड. कदम म्हणाले, कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या मदतीने ऑनलाईन शिक्षण दिले. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याबाबत नियोजन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी विविध कंपन्यासोबत करारही केले जाणार आहेत, अशी माहितीदेखील ॲड. कदम यांनी दिली. यावेळी शिक्षण मंडळांतर्गत संस्थांमधील विद्यार्थी, शिक्षक यांनी केलेल्या विशेष कामगिरीबद्दल सत्कार करुन गौरव करण्यात आला.
महत्वाच्या बातम्या
- देशातील शिक्षण प्रगत झाल्याशिवाय उद्योगविश्व किंवा जगाचे लक्ष आपल्याकडे जाणार नाही – सामंत
- मुख्यमंत्री घराबाहेर पडले ही खरी बातमी असावी; मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबाद दौऱ्यावरुन भातखळांची टीका
- आरएसएस विरोधात वक्तव्य केल्याने जावेद अख्तर यांच्या विरोधात तक्रार दाखल
- आगामी काळात दक्षिण नागपूरमध्ये २४ तास पाणीपुरवठा होणार – नितीन गडकरी
- ‘तू धोनी आहेस तर मी…’, सराव करत असलेल्या पाकिस्तानी क्रिकेटपटूची माहीला पाहून प्रतिक्रिया