राज्यात आरटीईचे प्रवेश अर्ज 8 फेब्रुवारीपासून

education rte

पुणे : शिक्षण हक्क कायद्यानुसार दिल्या जाणाऱ्या 25 टक्के राखीव जागांच्या प्रवेश प्रक्रिया अखेर 8 जानेवारीपासून राज्यभरात सुरू होणार आहेत. यासाठी आता पालकांना उत्पन्नाचा दाखला काढावा लागणार असून त्यांनी वेळेत हा दाखला काढला नाही तर, त्यांना प्रवेशासाठी मुकावे लागणार आहे. राज्यभरात आरटीईची ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया 24 जानेवारीपासून सुरू होणे अपेक्षित होते; मात्र शाळा नोंदणीच न झाल्याने हे वेळापत्रक पुढे ढकलण्यात आले होते.

आरटीईच्या संकेतस्थळावर सध्या अपेक्षित शाळा संख्या कमी झाली आहे. मात्र, काही शाळांच्या शाखांचे विलीनीकरण करून माहिती भरल्याने जागा अधिक व शाळा कमी दिसत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या पुण्यात 929 शाळांमध्ये 16 हजार 354 जागा उपलब्ध असल्याचे दिसत आहे; तर एकूणच राज्यात 8 हजार 979 शाळांमध्ये 1 लाख 25 हजार 543 जागा उपलब्ध असल्याचे संकेतस्थळावरील आकडेवारीतून समोर आले आहे. युडाएड वरून शाळा शोधून काही शाळांना शिक्षण विभागाने नोंदणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

दरम्यान, यावर्षी प्रथमच उत्पन्न दाखला ऑनलाइन भरायचे असून तो ऑनलाइन लिंक केला जाऊन तपासला जाणार असल्याने, यात तांत्रिक अडचणी निर्माण होऊ शकतात. तसेच, शाळा व शिक्षण अधिकारी यांनी ग्रामीण भागात कुठेही माहिती फलक लावलेले नाहीत. या अडचणी दूर करत अर्जनोंदणी लवकर सुरू करावी, अशी मागणी आम आदमी पक्षाचे मुकुंद किर्दत यांनी शिक्षण विभागाकडे केली आहे