नाशिकच्या विद्यार्थांचे शैक्षणिक प्रश्न नाशिक मध्येच सुटणार

विद्यार्थांचा त्रास कमी होणार

पुणे : सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कार्यक्षेत्र असणार्‍या नाशिक आणि नगर जिल्ह्यातील उपकेंद्रात  येत्या शैक्षणिक वर्षापासून महाविद्यालयांच्या परीक्षेसंदर्भातील सर्व कामे सुरु करण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी आज पत्रकार परिषेदेत दिली.

डॉ.करमळकर यांनी काही दिवसांपूर्वी नाशिक येथील विद्यापीठाच्या उपकेंद्राला भेट देऊन सोयीसुविधा, कामकाज आणि पायाभूत सुविधांची पाहणी केली. यावेळी त्यांना या ठिकाणी अनेक समस्या असल्याचे जाणवले. तसेच येथील विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भातील कोणत्याही अडचणी उदा.पुनर्मुल्यांकन, मार्कांच्या अडचणी, विषयांसदर्भातील समस्या अशा विविध विषयांसाठी नाशिकवरून पुणे विद्यापीठात यावे लागते.
समस्यांचे समाधान झाले नाही तर त्यांना सतत चकरा माराव्या लागतात.त्यामुळे प्रशासन व विद्यार्थी यांच्यात वाद होतात. या वादावर कायमचा तोडगा काढण्यासाठीच उपकेंद्रामध्ये सुधारणा व विकास करण्याचा निर्धार केला आहे. त्यादृष्टीने पावले टाकण्याचा विचार विद्यापीठ प्रशासनाने केला आहे.
यासंदर्भात माहिती देताना डॉ. करमळकर म्हणाले, विद्यापीठाचे कार्यक्षेत्र मोठे असून त्यात नाशिक आणि नगर या दोन प्रमुख जिल्ह्यांचा समावेश आहे. यातीलच नाशिक या ठिकाणी विज्ञान व तंत्रज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापन, मानस नीती व समाज विज्ञान, आंतरशाखीय विद्याशाखा या चार विद्याशाखांमधील किमान एक तसेच तेथील उद्योंगाना पुरक असणारे अभ्यासक्रम उपकेंद्रात २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठीच नाशिक येथे विविध जागांची आणि तेथील पायाभूत सुविधांची पाहणी करण्यात आली
आहे.
नाशिक विभागाअंतर्गत येणार्‍या महाविद्यालयांमधील अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे पेपर त्याच ठिकाणी तपासण्याबरोबरच परीक्षेसंदर्भातील कोणत्याही समस्यांचे निराकरण केले जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी पुणे विद्यापीठात चकरा मारण्याची आवश्यकता भासणार नाही. यासाठीच पुढील वर्षापासून नाशिक उपकेंद्रातच परीक्षेसंदर्भातील कामे करण्यासाठी आवश्यक सोयीसुविधांचा
विकास करण्यावर भर देणार असल्याचेही कुलगुरू डॉ.करमळकर यांनी सांगितले.