युवा दिन विशेष- कॉलेजबाहेर तंबू ठोकून घिसाडी पोरांचं इंजिनिअरींग

blank

टीम महाराष्ट्र देशा : औरंगाबाद : “लागली मुलं शिकवायला, शिकून मोठे इंजिनिअरच होणार असल्यागत.” हा नातेवाईकाने मारलेला टोमणा आईच्या काळजात रुतून बसला, अन्‌ “त्या’ मुलांच्या आईने त्यालाच आव्हान समजले. मुलांना शिकवून मोठे करण्याचे ठरविले. उराशी बाळगलेली जिद्द आता प्रत्यक्षात उतरतेय; दोन मुलं इंजिनिअर होताहेत. मुलगी स्पर्धा परिक्षेची तयारी करतेय.. ही कहानी आहे, मुलांच्या शिक्षणासाठी कॉलेजबाहेरच तंबू ठोकून घिसाड्याचे काम करणाऱ्या साळुंके कुटुंबाची.

blankमूळचे नवगाव (ता. पैठण) येथील अलका आणि भगवान साळुंके यांचा मनोज, विनोद, वर्षा आणि सुनिल असा परिवार. पोट भरण्यासाठी गाव बदलत वडिलोपार्जित घिसाडकाम करतच ते बीडवरुन इथे पोहचले होते. मुले लहान होती, तोपर्यंत थोडेफार पैसे गाठीशी बांधत तिथेच घरही घेतले. मात्र, मुलांच्या शिक्षणासाठी घर विकावं लागलं. अर्थातच त्यानंतर प्रवास पुन्हा घिसाडकाम करणाऱ्या कुटुंबाप्रमाणेच. सुरवात झाली ती, मुलीच्या शिक्षणाने. धानोरा रुई (ता. गेरवाई) येथे वर्षा हिच्या बी. एड. साठी तीन वर्ष मुक्‍काम टाकला. दरम्यान, अकरावीला दांडी मारुन दोन वर्षे कंपनीत नोकरी करणाऱ्या मनोजला बहिणीचे शिक्षण संपायच्या एक वर्ष आधीच छत्रपती शाहू महाराज पॉलिटेक्‍निकला प्रवेश मिळाला. तिचे शिक्षण संपल्यानंतर मनोजच्या शिक्षणासाठी कुटुंबाने कांचनवाडी येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेच्या पॉलिटेक्‍निक आणि इंजिनिअरिंग कॉलेजबाहरेच आपला तंबू थाटला.

blankकांचनवाडीत कचराकुंडी हटवून संसार थाटलेल्या साळुंके कुटुंबातील मनोज, छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेत पॉलिटेक्‍निक पूर्ण करुन इंजिनिअरींगच्या दुसऱ्या वर्षाला आहे. त्याचाच कित्ता गिरवत लहान भाऊ विनोद त्याच कॉलेजात पॉलिटेक्‍निकच्या दुसऱ्या वर्षाला शिकतोय. बहीण बी. एड. करुन स्पर्धा परीक्षेची तयारी करतेय. सुनिल बिडकीनला रोज 20 किलोमीटर प्रवास करुन नववीच्या वर्गात शिकतोय. सुरवातीचे तीन महिने रस्त्याकडेच्या झोपडीतच काढल्यानंतर आता चंद्रकला देवकते यांनी त्यांना राहायला पत्र्याची खोली दिली आहे. शिक्षणासाठी नातेवाईकांकडे लाखांवर उसनवारी झाली असली, तरी जमेल तशी फेडण्याचा प्रयत्नही हे कुटुंब करत आहे.

blank
संघर्षात मिळणारे मदतीचे हात…– संघर्षात मदत करणाऱ्यांची नावं मनोज आणि कुटुंबियांच्या तोंडून पटापट बाहेर पडतात. यात आई वडिलांना बोलता यावे, यासाठी मोबाईल रिचार्ज करून देणारे गोसावी सर. कॉलेज फीसमध्ये सवलत देणारे शिक्षण संस्थेचे प्रशासन. एकही रुपया न घेता गणित शिकवणारे मतीन सय्यद. विषयांच्या माहितीसोबत इंजिनिअरींगच्या अभ्यासाबाबत मार्गदर्शन करणारे संकेत जाधव, मोहसीन इनामदार यांच्यासारखे मित्र. घिसाडकामासाठी जागा देणारे नगरसेवक जनार्दन कांबळे, वामनराव वाघमोडे, तसेच खानावळ आणि घरभाडे बाकी असतानाही उन्हा-पावसात संरक्षण करण्यासाठी पत्र्याची खोली देणारे सूरज आणि चंद्रकला देवकते इत्यादि. सोळुंके कुटुंबीय त्यांना “पडत्या काळातील देवदूत’ अशीच उपमा देतात.

blank

कॉलेजला येता-जाता सहकारी पहायचे. कुतुहलापोटी काहींनी भावनिक आधार दिला. “तू अभ्यास कर’ म्हणत काहींनी क्‍लासच्या नोट्‌सही पुरवल्या. कधी पैसे नसल्याने प्रॅक्‍टिकल्स पूर्ण करण्यात अडचणी यायच्या. सादर करायला वेळ लागल्याने काही मित्र टोमणेही मारायचे. मात्र, मदतीचे हात भक्कम असल्याने त्याकडे दुर्लक्षच करतो.  – मनोज साळुंके  (सौजन्य – अतुल पाटील, औरंगाबाद. )

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, फाॅलो करा टि्वटर आणि जी प्लसवर