स्वतंत्र कोकण विद्यापीठ प्रश्न सुटण्याच्या मार्गावर

Vinod_Tawde

रत्नागिरी: कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठाबाबत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी तातडीने बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयामध्ये गंभीरपणे लक्ष न घातल्याने कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ मिळण्याच्या आशा संपुष्टात आली होती. मात्र आता पुन्हा कोकणाला स्वतंत्र विद्यापीठ मिळणार म्हणून चर्चा सुरु आहे.

काही दिवसांपूर्वीच आमदार राजन साळवी यांनी आपण कोकणातील सर्व आमदारांना एकत्र घेऊन स्वतंत्र विद्यापीठाबाबत पाठपुरावा करू असे आश्वासन दिले होते. दिलेले आश्वासन पाळत आमदार राजन साळवी यांनी सध्या सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कोकणाला स्वतंत्र विद्यापीठ मिळयासंदर्भात प्रश्न उपस्थित केला. तत्पूर्वी कालच रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली कोकणातील शिवसेनेच्या सर्व आमदारांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत कोकणाला स्वतंत्र विद्यापीठ मिळण्याची एकमुखी मागणी केली होती.

आमदार राजन साळवी यांनी आज विधिमंडळामध्ये शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यासमयी विनोद तावडे यांनी तात्काळ या मागणी संदर्भात एक विशेष समिती स्थापन केली व या समितीच्या अहवालानुसार पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले.