खुद्द शिक्षण मंत्र्यांनाच गणित येईना , न्याय योजनेचे करून दाखवले असे गणित

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालघर लोकसभा मतदार संघातून युतीचे उमेदवार म्हणून राजेंद्र गावित यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.राजेंद्र गावित यांचा उमेदवारी अर्ज दाखल करते वेळी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे हे देखील उपस्थित होते. यावेळी तावडे यांनी राहुल गांधी यांच्या न्याय योजेनवर टीका करताना उपस्थितांना भलताच गुणाकार करून दाखवला. यामुळे शिक्षण मंत्री तावडे यांचे विनोदी गणित कोणाला समजले नसल्याने तावडेंची इयत्ता नेमकी कोणती असा प्रश्न निर्माण होऊ लागला.

यावेळी झाले असे की, न्याय योजने अंतर्गत कॉंग्रेस पक्ष गरिबांच्या खात्यात वर्षाला ७२ हजार रुपये जमा करणार आहेत.  हे ७२ हजार महिन्याला ६ हजार यानुसार वर्षभरात खात्यात जमा होणार आहेत. मात्र विनोद तावडे यांनी राहुल गांधी गरिबांच्या खात्यात महिन्याला 7 हजार रुपये जमा करण्याची घोषणा केल्याने वर्षाला त्यांच्या खात्यात 72 हजार जमा होणार आहेत.’, असे वक्तव्य केले. त्यामुळे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचा गुणाकार नक्की कोणत्या पद्धतीचा यावरून आता तावडे ट्रोल होऊ लागले आहेत.

दरम्यान याआधी देखील विनोद तावडे हे त्यांच्या पदवीवरून तर कधी त्यांच्या शिवराळ भाषेवरून माध्यमांच्या कैचीत सापडले होते. त्यामुळे सतत वादाच्या भोवऱ्यात अडकणारे तावडे आता पुन्हा एकदा गणित विषयच्या कमी अध्ययना मुळे वादाच्या भोवऱ्यात अडकताना दिसत आहेत.