ओला, उबरमुळे वाहन क्षेत्रात मंदी : सीतारमण

टीम महाराष्ट्र देशा : भारतीय अर्थव्यवस्था सध्या डबघाईला आल्याचे चित्र आहे. भारताचा विकासदर हा गेल्या आठ वर्षातील सर्वात खालच्या पातळीवर पोहोचला आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील विकासदर ५ टक्के इतका आहे. सध्या वाहन क्षेत्रात तब्बल २३ टक्क्यांची घट झाली आहे. वाहनांची यावर्षीची विक्री मागील २१ वर्षांमधील सर्वात कमी आहे.

याविषयी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी वाहन क्षेत्रातील मांडीवर भाष्य केले आहे. त्यांनी ‘BS6 स्टँडर्ड, नोंदणी शुल्काशी संबंधित प्रकरणं आणि लोकांची मानसिकता याचा वाहन क्षेत्रावर सर्वाधिक परिणाम झाला आहे. सध्या जास्तीत जास्त लोक गाडी खरेदी करण्याऐवजी ओला-उबरला प्राधान्य देतात. लोक गाडी खरेदी करुन EMI भरण्यापासून स्वतःला दूर ठेवतात आणि ओला-उबरला प्राधान्य देतात असं विधान केले आहे.

तसेच पुढे बोलताना त्यांनी ‘सरकार सकल घरेलु उत्पन्न (GDP) वाढवण्यासाठी काहीही करत नाही असं नाही. उलट जीडीपीमधील घट हा विकासाच्या प्रक्रियेतीलच एक भाग आहे. पुढील तिमाहीत जीडीपी कसा वाढेल यावरच आमचा भर आहे. सरकार वाहन क्षेत्रातील मंदीतून बाहेर येण्यासाठी काम करत आहे. यासाठी लवकरच काही निर्णय घेतले जातील असं विधान केले आहे.

दरम्यान, माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ञ डॉ मनमोहनसिंह यांनी मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देश आर्थिक मंदीकडे चालला आहे असं विधान केले होते. मोदी सरकारने घेतलेल्या चुकीच्या निर्णयांचा फटका आज देशाला बसत आहे. नोटबंदी आणि जीएसटी यासारखे निर्णय देशातील आर्थिक मंदीसाठी कारणीभूत ठरत आहेत, अशी टीका मनमोहन सिंग यांनी केली होती.