औरंगाबादेतील स्मशानभूमींमध्ये होणार पर्यावरणपूरक लगद्यांच्या विटाचा वापर, पालिकेचा नवउपक्रम!

औरंगाबाद : स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी वापरल्या जाणाऱ्या लाकडाऐवजी लगद्याच्या विटांचा वापर करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. त्यानुसार निविदा काढण्यात आली होती. चार वेळा निविदा प्रसिद्ध केल्यानंतर केवळ एका कंपनीने यासाठी प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे लवकरच लगद्याच्या विटांचा वापर स्मशानभूमीत होणार आहे.

महापालिकेने काही वर्षांपूर्वी विद्युत दाहिनी सुरू केली होती. मात्र अंत्यसंस्कारांसाठी विद्युद्दाहिनीचा वापर करण्याची अनेकांची मानसिकता नाही. शहरातील प्रत्येक स्मशानभूमीत शंभर टक्के लाकडांचा वापर करण्यात येतो. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. कोरोनामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर मृत्यू  वाढले होते. त्यातच स्मशानभूमींमध्ये अंतिम संस्कारासाठी रांगा लागत होत्या.
शहरातील प्रमुख पाच स्मशानभूमीमध्ये गॅस दाहिनी उभारण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. विद्युत दाहिनी बसवण्यासाठी महापालिकेने तयारी सुरू केली आहे.कैलास नगर स्मशानभूमीत औरंगाबाद फस्ट संघटनेतर्फे सुरू असलेले काम प्रगतिपथावर आहे.

प्रताप नगर स्मशानभूमीत क्रेडाई व पालिका निम्मा निम्मा खर्च करणार आहे. सिडको येथील स्मशानभूमीत महापालिकेच्या माध्यमातून हे काम केले जाणार आहे. त्यासोबतच लाकडाऐवजी लगद्यापासून तयार केलेल्या विटांचा वापर करण्याचा निर्णय प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी घेतला आहे. त्यानुसार महापालिकेने निविदा काढली होती. चार वेळेस निविदा प्रसिद्ध केल्यानंतर एका कंपनीने प्रतिसाद दिला. कंपनीने विटांचे नमुने महापालिकेला सादर केले आहेत. त्यांची तपासणी पुण्यात केली जाणार आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर निविदा उघडून कार्यारंभ आदेश देण्यात येतील असे सूत्रांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

IMP