समितीतला पर्यावरणपूरक ‘झीरो बजेट’ गणेशोत्सव

samiti

पुणे : गणेशोत्सवात बहुतेक जण आपापल्या गावी, घरी जाऊन बाप्पाचं स्वागत करतात. काही विद्यार्थ्यांना मात्र घरी जायला मिळत नाही, अशा विद्यार्थ्यांना गणेशोत्सवाचा आनंद घेता यावा यासाठी विद्यार्थी सहायक समितीमध्येही दरवर्षी तीन दिवसांचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा होतो. याचे वैशिष्ट्य म्हणजे हा गणेशोत्सव ‘झीरो बजेट’ असतो. परिसरातील टाकाऊ वस्तू यासाठी उपयोगात आणल्या जातात.

समितीच्या मुलांच्या लजपतराय विद्यार्थी वसतिगृहात, मुलींच्या आपटे वसतिगृहात आणि सुमित्रासदन वसतिगृहात हा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला जातो. वेगवेगळ्या स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि आनंदोत्सव या तीन दिवसांत असतो. मान्यवर मंडळीही मुलांशी गप्पा मारण्यासाठी येतात. यंदा ‘भेट युवा कलाकाराची’ या कार्यक्रमात आयटमगिरी फेम अभिनेता शशी ठोसर याने विद्यार्थ्यांशी गप्पा मारल्या. ठोसर यांची मुलाखत समितीचा माजी विद्यार्थी लक्ष्मण जाधव याने घेतली. लजपतराय विद्यार्थी वसतिगृहात यंदा पुण्यातील रस्तासुरक्षा, सिग्नल यंत्रणा यावर डेकोरेशन केले आहे.

सुमित्रासदन वसतिगृहात एकही पैसा खर्च न करता इको फ्रेंडली गणपती बसवण्यात आला होता. वसतिगृहातील बागेच्या मातीतून गणपती बनवून मूर्तीला हळद, कुंकू यासारखे नैसर्गिक रंगाने रंगविले होते. वसतिगृहातील गोष्टींचा उपयोग करीत डेकोरेशन करण्यात आले होते. आपटे हॉस्टेलमधील मुली डेकोरेशनसाठी आपल्याकडे असलेल्या सगळ्यात सुंदर ओढण्या देतात. येथे सर्वधर्म सहिष्णुतेवर आधारित डेकोरेशन केले होते.  पाणी बचत, स्री सुरक्षितता यासंबंधी विविध विषय देऊन ड्रॉइंग, पोस्टर अशा स्पर्धा घेण्यात आल्या. तीनही वसतिगृहाचे पर्यवेक्षक, समितीचे पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी यामध्ये विद्यार्थ्यांना सहकार्य, मार्गदर्शन केले.