आरक्षण दिले खरे पण, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे परीक्षा फॉर्मच भरता येईना..

fadnvis x maratha arkshan

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण मिळाल्या नंतरच भरती प्रक्रिया सुरु होणार असे आश्वासन दिले होते. त्या प्रमाणे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नुकतीच विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली. त्यात सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (एसईबीसी) या प्रवर्गाअंतर्गत मराठा समाजालाही प्रतिनिधित्व दिले. मात्र, प्रत्यक्ष अर्ज भरण्यातांना या प्रवर्गातील लाखो विद्यार्थ्यांसमोर अडथळा निर्माण झाला आहे. यापूर्वी संकेतस्थळावर नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांच्या वर्गवारीतील माहितीच अपडेट होत नाही. त्यामुळे त्यांना अर्जही करता येत नाही. परिणामी हजारो विद्यार्थी या अडचणीमुळे त्रस्त झाले आहेत.

राज्य शासनाने मराठा समाजाला ‘एसईबीसी’ अंतर्गत १६ टक्के आरक्षण दिले आहे. त्यानुसार आयोगाने नुकतीच विविध ३४२ पदांसाठी राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये ‘एसईबीसी’ प्रवर्ग देऊन १६ टक्के जागा राखीव ठेवल्या आहेत. त्याप्रमाणे मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. यात गडबड आहे ती, पूर्वी ऑनलाईन नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची. तर नव्याने अर्ज भरण्यात विद्यार्थ्यांना अडचणी यात काहीच अडचण येत नाहीये.

महाऑनलाईन एमपीएससीच्या संकेतस्थळावर अर्ज भरण्यासाठी सुरुवातीला विद्यार्थ्यांनी नोंदणी करावी लागते. त्यानंतर प्रोफाईलमध्ये संपूर्ण माहिती भरणे आवश्यक असते. यामध्ये प्राथमिक माहितीनुसार जातीनुसार प्रवर्गाची निवड केली जाते. परंतु ही निवड एकदा करून जतन केल्यास त्यानंतर यात कुठलाही बदल करता येत नाही. राज्यसेवेच्या जाहिरातीत दिल्याप्रमाणे एसईबीसी प्रवर्गाच्या वेगळ्या जागा आहेत. आता ज्या मराठा विद्यार्थ्यांनी यापूर्वी आपल्या प्रोफाईलमध्ये खुल्या प्रवर्गाची निवड केली आहे, अशा मराठा विद्यार्थ्यांना आता एसईबीसी हा प्रवर्ग अपडेट करता येत नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.