खा. इम्तियाज जलील यांच्याकडून घाटीला तीन रुग्णवाहिका भेट, मोफत देणार सुविधा

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात कोरोनाग्रस्त व इतर आजाराने त्रस्त गोरगरीब रुग्णांना वेळेवर रुग्णालयात पोहोचता यावे म्हणुन खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद शहराकरिता स्वखर्चाने तीन नविन रुग्णवाहिकेची मोफत व्यवस्था केली आहे. औरंगाबाद शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात सामान्य रुग्णालय, औषधीशास्त्र आणि अतिदक्षता विभागात अहोरात्र सेवा देणाऱ्या प्रभाकर शेवलेकर, माधवी गोजेगावे, अफसर बानो नसिम बानो, जिजा राठोड, मोहम्मद सलिम अब्दुल रसुल, राहुल आठवले, आशेय केदारी या चतुर्थश्रेणी कर्मचारी नर्स, वार्डबॉय, सेक्युरिटी गार्ड यांच्या हस्ते आज दिनांक ३ मे रोजी उद्घाटन करण्यात आले.

शहरात कोविडचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने अनेक उपाययोजनांची अमलबजावणी करण्यात येत आहे. त्यालाच मदतीचा एक हाथ म्हणुन खासदार इम्तियाज जलील यांनी गोरगरीब रुग्णांकरिता सदरील तिन्ही रुग्णवाहिका पुर्णपणे मोफत उपलब्ध करुन दिले आहे. तिन्ही रुग्णवाहिका शहरातील रुग्णांना मोफत सेवा देणार असुन विशेष म्हणजे तिन्ही रुग्णवाहिकेत गंभीर आजारी रुग्णाकरिता ऑक्सीजनची सुध्दा मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. गोरगरीब रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णवाहिकेची सेवा घेतांना कोणत्याही प्रकारचे शुल्क लागणार नसल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी जाहिर केले आहे.

कोविडग्रस्त झालेल्या रुग्णांची सेवा बजावतांना पिपिई किट जी की सामान्य व्यक्ती पाच ते दहा मिनिटाच्यावर परिधान करु शकत नाही. तीच पिपिई किट हे कर्मचारी २४ तास वापरुन रुग्णसेवा करतात. रुग्णांना जेवण देणे, पाणी देणे, औषधी देणे व त्यांना हव्या नको असलेल्या सर्व बाबींवर बारकाईने लक्ष केंद्रित करुन रुग्ण बरा करण्याच्या हेतुने अखंड कार्यरत राहणारे कर्मचारीच या महत्वपुर्ण लोकार्पण सोहळ्याचे मानकरी ठरु शकतात. म्हणुनच त्यांच्याच हस्ते आजचा हा लोकार्पण सोहळा संपन्न झाल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या