रत्नागिरी जिल्ह्यात जाणवले भूकंपाचे धक्के

रत्नागिरी :कोयना परिसरात आज पहाटे झालेल्या भूकंपाचे धक्के रत्नागिरी जिल्ह्यातही जाणवले. मात्र भूकंपाने कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची नोंद दुपारपर्यंत झालेली नाही. आज पहाटे ५ वाजून २० मिनिटांनी सौम्य भूकंप झाला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३.५ एवढी होती.

कोयना परिसरापासून २१ किलोमीटर अंतरावर असलेल्या वारणेतील जवळे गावाजवळ भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती मिळाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी, चिपळूण, देवरूख, संगमेश्वर, लांजा आणि राजापूर तालुक्याच्या काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले.

भूकंपाची तीव्रता कमी असली तर त्याचा कालावधी जास्त होता. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. भूकंपानंतर काही नागरिक घराबाहेर आले. पहाटे फिरायला बाहेर पडलेल्यांना तर हे धक्के जाणवलेच, शिवाय झोपेत असलेल्यांनाही हे धक्के जाणवले.गेले चार दिवस रात्री थंडीचे प्रमाण वाढले आहे. दिवसा प्रचंड उष्मा होत आहे, तर पहाटे परिसर धुक्यात हरवत आहे. अशा विचित्र वातावरणात आज पहाटे भूकंप झाल्याने वातावरणातील बदलाचा आणखी एक प्रकार नागरिकांनी अनुभवला. जिल्हा नियंत्रण कक्षात भूकंपाची नोंद झाली असली, तरी भूकंपाने झालेल्या नुकसानीची कोणतीही नोंद दुपारपर्यंत झाली नव्हती.