पुणेकरांच्या सेवेत आता अत्याधुनिक व स्वयंचलित ई-टॉयलेट

blank

पुणे : सार्वजनिक शौचालयांची शहरातील गरज लक्षात घेत नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी स्वच्छ व चांगली शौचालये उपलब्ध व्हावी या हेतूने पुणे शहराचे खासदार अनिल शिरोळे यांच्या विकास निधी मधून शहरात अत्याधुनिक व स्वयंचलित ई टॉयलेट उपलब्ध करून देण्यात आली आहेत. शहराच्या महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते आज जंगली महाराज रस्त्यावरील हॉटेल शिवसागर समोर उभारलेल्या या ई टॉयलेटचे उद्घाटन आज करण्यात आले. खासदार अनिल शिरोळे, डेक्कन जिमखाना – मॉडेल कॉलनी प्रभागाचे नगरसेवक व पीएमपीएमएलचे संचालक सिद्धार्थ शिरोळे, नीलिमा खाडे, स्वाती लोखंडे व जोत्स्ना एकबोटे, ईराम सायंटीफिकचे प्रमुख विपणन व्यवस्थापक बरनार्ड अॅनड्रेड, अशोका डेव्हलपर्सचे विशाल कदम, आदित्य चासकर आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या, आज शहराची लोकसंख्या लक्षात घेत शौचालयांची संख्या वाढणे गरजेचे आहे, हेच जाणत महापालिकेनेही हा प्रश्न सोडविण्यासाठी पावले उचलली आहेत. नागरिकांच्या मागणीचा विचार करीत कमी जागेत अत्याधुनिक आणि मानवविरहित अशी ही ई टॉयलेट उभारत खासदार अनिल शिरोळे यांनी केलेल्या या मदतीबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. ज्याप्रमाणे परदेशात सार्वजनिक शौचालयांची स्थिती चांगली असते त्याच धर्तीवर आम्ही देखील ही ई- टॉयलेट स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्नशील असू यामध्ये नागरिकांचे सहकार्य देखील अपेक्षित आहे.

खासदार अनिल शिरोळे म्हणाले की, आज शहरात स्वच्छता हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यावर काम करीत असताना सार्वजनिक शौचालयांचा प्रश्न कळीचा मुद्दा आहे हे जाणवले. प्रत्येक नागरिकाला घरातून बाहेर पडल्यानंतर सार्वजनिक शौचालयाचा वापर करावा लागल्यास त्या ठिकाणी असलेली अस्वच्छता त्यांच्या आरोग्यासाठी देखील घातक आहे. हेच लक्षात घेत एक स्मार्ट शहराच्या दिशेने वाटचाल करीत असताना ई टॉयलेट सारखी मानवविरहित व स्वयंचलित प्रणाली असलेली ही शौचालये बसविण्याचे माझ्या मनात होते. त्यालाच आता मूर्त स्वरूप आले आहे. जंगली महाराज रस्त्यावरील हॉटेल शिवसागर समोर व मॉडेल कॉलनी येथील ओम सुपर मार्केट जवळ या भागात आज या प्रातिनिधिक ई – टॉयलेटचे उद्घाटन करण्यात आले. अशा पद्धतीने तब्बल १० ठिकाणी आम्ही अशी १४ ई – टॉयलेट उभारणार आहोत. ही टॉयलेट सेल्फ मेंटेन असल्यामुळे त्याचा नागरीकांनाही निश्चित फायदा होईल.

या ई टॉयलेट बद्दल बोलताना सिद्धार्थ शिरोळे म्हणाले की, ही ई टॉयलेट गंज न चढू शकणा-या नॉन रस्टिंग स्टीलचा वापर करीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने बनविण्यात आली आहेत. महिला व पुरुष अशा दोघांसाठी वेगवेगळी अशी ही ई टॉयलेट असून त्यामध्ये स्वच्छतेची विशेष काळजी घेण्यात आली आहे. ही ई टॉयलेट इलेक्ट्रॉनिक पद्धातीची असून त्याच्या अंतर्भागात पाणी सोडणे, फ्लोअर साफ होणे आदी कामे स्वयंचलित पद्धतीने होतील. पाण्याची सोय म्हणून प्रत्येक टॉयलेटच्या वर प्रत्येकी ३०० लिटरची पाण्याची टाकी बसविण्यात आली आहे. याबरोबरच ही टॉयलेट ड्रेनेज लाईनला जोडलेली असल्याने घाणीचा त्रास होणार नाही याची विशेष दक्षत घेण्यात आली असल्याचे आहे.

याबरोबरच हे ई टॉयलेट वापरायचे असल्यास आपल्याला पन्नास पैसे, एक रुपया, दोन रुपये, पाच रुपये अथवा १० रुपये यापैकी कोणतेही एक नाणे वापरता येणार आहे. नागरिकांना सवय लागावी म्हणून ही नाममात्र रक्कम ठेवण्यात आली असल्याने तुम्ही कोणतेही नाणे टाकले की सदर टॉयलेट अनलॉक होऊन तुम्हाला ते वापरता येईल. या ई टॉयलेटचे वैशिष्ट्य म्हणजे याला सेन्सर बसविण्यात आले असून ही सर्व टॉयलेट इंटरनेटच्या माध्यमातून जोडलेली आहेत. यामध्ये असलेल्या सेन्सरमुळे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाला या टॉयलेटची स्थिती, बिघाड हे लागलीच कळणार आहे. ईराम सायंटिफिक व अशोका डेव्हलपर्स यांच्या मदतीने ई- टॉयलेटचे अॅपही बनविण्यात आले असून त्याद्वारे याचे अत्याधुनिक पद्धतीने व्यवस्थापन करण्यात येणार असल्याचे सिद्धार्थ शिरोळे यांनी यावेळी स्पष्ट केले.

blank

पहिल्या टप्प्यात अशा प्रकारची ई- टॉयलेट संपूर्ण शहरात १० ठिकाणी बसविण्यात येणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले. यासाठी आपले खासदार अनिल शिरोळे यांनी तब्बल सव्वा दोन कोटींचा निधी दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. यापैकी जंगली महाराज रस्त्यावरील हॉटेल शिवसागर समोर दोन महिलांची तर मॉडेल कॉलनी, ओम सुपर मार्केट जवळ एक महिला व एक पुरूषांसाठीचे ई- टॉयलेट उभारण्यात आले आहे. ज्याचे उद्घाटन आज महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते करण्यात आले. याशिवाय शहरातील फर्गसन रस्तावरील रुपाली समोर, हिरवाई गार्डन, शिवाजीनगर न्यायालय परिसर, सेनापती बापट रस्ता, वारजे फ्लायओव्हरच्या खाली, नीलायम चित्रपट गृहाजवळ, विमान नगर आणि सिंहगड रस्त्यावरील राजाराम पुलाजवळ असलेल्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प या ठिकाणी ही ई- टॉयलेट उभारण्यात येतील.

महापौरांच्याच प्रभागात कचऱ्याचे ढीग; अन फुकटचे फोटो काढण्यासाठी सगळ्यांची रीघ

पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य; संजय काकडेंच्या गर्जनेनंतर शिरोळेंचा सावध पवित्रा

मुख्यमंत्री साहेब मुंढेना परत बोलवा पुण्याच्या महापौरांची मागणी