शासकीय जमिनी भाडेतत्त्वावर देण्यासाठी ई-लिलाव

टीम महाराष्ट्र देशा- पुणे महापालिकेच्या हद्दीत नव्याने सामावून घेण्यात आलेल्या ११ गावांमधील शासकीय जमिनी शाळा आणि हॉस्पिटलच्या वापरासाठी भाडेतत्त्वावर देण्यासाठी ‘ई-लिलाव’ पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) सुरू करण्यात आला आहे. परंतु या 11 गावांमधून फुरसुंगी, लोहगाव आणि बावधन ही तीन गावे वगळण्यात आल्याची माहिती पीएमआरडीएचे महानगर आयुक्त किरण गित्ते यांनी दिली.जिल्हा प्रशासनाकडून पीएमआरडीएच्या हद्दीतील अकरा गावांमधील दहा मोकळ्या जागा (ॲमेनिटी स्पेसेस) हस्तांतरित केल्या आहेत. त्या जागा दीर्घ मुदतीसाठी भाडेतत्त्वावर देऊन त्यातून निधी उभारणीसाठी ‘ई-लिलाव’बाबत नगरविकास खात्याची परवानगी घेण्यात आली. त्यानुसार शाळा आणि हॉस्पिटलच्या वापरासाठी या जागांचा लिलाव सुरू करण्यात आला.या दहा जागा मुंढवा, मांजगाव, उंड्री, पिसोळी, हिंजवडी, बावधन, म्हाळुंगे आणि वाघोली येथील आहेत. परंतु यापैकी फुरसुंगी, लोहगाव आणि बावधन ही गावे महापालिकेत समाविष्ट केल्यामुळे त्या ठिकाणच्या जागा राज्य सरकारने ई लिलावमधून वगळल्या आहेत. या लिलावात जागांची चालू बाजारभावानुसार (रेडीरेकनर) बोली लावली जाणार आहे. त्यातून जवळपास ५० कोटींपेक्षा जास्त महसूल पीएमआरडीएला मिळणे अपेक्षित आहे.