लोकशाहीतील घराणेशाही (भाग दोन ) : मोहिते-पाटील कुटुंबीय

टीम महाराष्ट्र देशा- राजा हा राजाच्या पोटी नव्हे तर मतपेटीतून जन्माला यावा असे घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हटले आहे. मात्र गल्लीपासून दिल्लीपर्यंत घराणेशाहीच्या वाळवीने लोकशाहीला पोकळ केले असल्याचे चित्र आहे.देशातील सर्व पक्ष घराणेशाहीला आमचा विरोध असल्याचं दाखवतात मात्र मुंबईतील मातोश्री ते परळीतील यशश्रीपर्यंत आणि बारामती पासून नागपूर पर्यंत सगळीकडे घराणेशाही पहायला मिळते.

Loading...

भारत हा लोकशाहीप्रधान देश आहे असं म्हटलं जात मात्र या लोकशाहीचा बुरखा पांघरून प्रस्थापित नेत्यांकडून कशा पद्धतीने घराणेशाही चालवली जाते हे आम्ही जनतेसमोर आणत आहोत. लोकशाहीतील घराणेशाही या आमच्या विशेष सदरात महाराष्ट्रातील विविध घराणी कशापद्धतीने सत्ता आपल्याच घरात रहावी यासाठी प्रयत्नशील असतात हे आपण जाणून घेणार आहोत. आज आपण पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोठा दबदबा आहे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे खासदार माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांविषयी जाणून घेणार आहोत.

पश्चिम महाराष्ट्रातील मातब्बर नेते म्हणून ओळख असलेले आणि सोलापूर जिल्ह्यात कायमस्वरूपी दबदबा असलेले नेते म्हणजे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील होय. शरद पवार यांचे विश्वासू सहकारी असून राजकारणातील घरणेशाही बघितली तर मोहिते-पाटील यांच्या घरातील जवळजवळ डझनभर कुटुंबीय वेगवेगळ्या राजकीय पदावर कार्यरत आहेत.

कै.शंकरराव मोहिते पाटील
सहकारमहर्षी म्हणून ओळखले जाणारे दिवंगत शंकरराव मोहिते-पाटील यांनी अकलूजमध्ये लावलेला राजकीय वृक्ष नंतर इतका फोफावला, की सबंध सोलापूर जिल्ह्यात त्याचे रूपांतर वटवृक्षात झाले. तालुक्या-तालुक्यात काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसला समांतर असा पक्ष म्हणावा इतकी प्रभावी अशी ‘मोहिते-पाटील गट’ नावाची एक स्वतंत्र राजकीय यंत्रणा उभी राहिली. आरंभीच्या काळात करमाळय़ाचे नामदेवराव जगताप आणि अकलूजचे शंकरराव मोहिते-पाटील असे दोन गट होते. पण नंतर जगताप गट बाजूला पडत गेला आणि सोलापूर जिल्ह्यावर मोहिते-पाटलांचे एकछत्री वर्चस्व प्रस्थापित झाले.

विजयसिंह मोहिते-पाटील

माजी उपमुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार, पर्यटन मंत्री तसेच शरद पवारांचे विश्वासू आणि सोलापूर जिल्ह्यातील वजनदार नेते आणि राष्ट्रवादीचे मातब्बर नेते. सोलापूर जिल्ह्यात यांचा कायम दबदबा राहिलेला आहे.

कै.प्रतापसिंह मोहिते पाटील
शिवसेना-भाजप सरकारमध्ये भाजपकडून सहकार राज्यमंत्री,सोलापूर लोकसभा मतदारसंघातून 1,22,817 मताधिक्याने विजयी झाले होते.जि. प. सोलापूर अध्यक्ष,विधानपरिषद सदस्य अशी विविध पदे भूषविली. २०१४ च्या लोकसभा निवडणुका लागताच विजयदादांच्या विरोधात धाकटे बंधू प्रतापसिंह यांनी आपल्या उमेदवारीची घोषणा केली. खरे तर हे अघटित होते. दूरवरच्या तालुक्यातील आमदारही विजयदादांच्या शब्दाबाहेर नसायचा, तिथे घरातूनच विरोधाचे सूर उमटले. कालचक्र भलतेच फिरले. लोकसभेच्या निवडणुकीसाठी दोन भाऊ एकमेकांविरोधात उभे ठाकले होते. जनसेवा संघटना, शंकरराव मोहिते-पाटील प्रतिष्ठान, शंकरराव मोहिते-पाटील रक्तपेढी, औद्योगिक वसाहत, धनश्री महिला पतसंस्था, प्रभू श्रीरामचंद्र सार्वजनिक ट्रस्ट. या संस्थांचे ते संस्थापक होते. प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे २०१५ साली निधन झाले.

रणजीतसिंह मोहिते-पाटील

विजयसिंह मोहिते-पाटील याचे सुपुत्र २००९ साली सुप्रिया सुळे ह्या बारामती मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या आणि रिक्त झालेल्या राज्यसभेवर रणजीतसिंह मोहिते-पाटील यांना संधी मिळाली. तसेच विधानपरिषदेचे माजी आमदार ही होते.

राजसिंह मोहिते-पाटील
विजयसिंह मोहिते-पाटील यांचे दोन नंबरचे बंधू कुक्कुटपालन संघाचे माजी अध्यक्ष होते.

धैर्यशील मोहिते-पाटील

विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुतणे असून राजसिंह मोहिते-पाटील यांचे सुपुत्र आहेत. सध्या ते सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आहेत.

शितलदेवी धैर्यशील मोहिते-पाटील

ह्या धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पत्नी असून सध्या सोलापूर जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत. माळशीरस तालुक्यातील बोरगाव गटातून निवडून आलेल्या आहेत.

जयसिंह मोहिते-पाटील

विजयसिंह मोहिते-पाटील यांचे बंधू असून सहकार महर्षी साखर कारखान्याचे चेअरमन आहेत.

स्वरूपाराणी मोहिते-पाटील
विजयसिंह मोहिते-पाटील यांची पुतणी असून जयसिंह मोहिते-पाटील यांच्या कन्या आहेत विद्यमान जिल्हा परिषद सदस्य असून अकलूज गटातून जिल्हा परिषदेवर निवडून आलेल्या आहेत.

धवलसिंह मोहिते-पाटील

विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुतणे आणि माजी सहकार मंत्री कै प्रतापसिंह मोहिते-पाटील यांचे सुपुत्र असून २०१४ साली त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि शिवसेनेचे सोलापूर जिल्हा सहसंपर्क झाले. सध्या २०१९ माढा लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार असल्याची चर्चा सुरू आहे.

उर्वशीराजे धवलसिंह मोहिते-पाटील

विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या चुलत सुष्ना असून धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या पत्नी आहेत माळशीरस पंचायत समितीच्या सदस्य आहेत.

मदनसिंह मोहिते-पाटील

विजयसिंह मोहिते-पाटील यांचे बंधू असून माळशीरस कृषि उत्पन्न समितीचे चेअरमन आहेत.

वैष्णवीदेवी मोहिते-पाटील

विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या चुलत सुष्ना सून माळशीरस पंचायत समितीच्या सदस्य आहेत

शिवतेजसिंह मोहिते-पाटील
विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुतणे असून आशीया खंडातील एक नंबर असलेल्या अकलूज ग्रामपंचायत चे विद्यमान सरपंच आहेत.

सर्व नेते आपल्याबाजूने जनतेचा विकास करण्यासाठी काम करत असतात. मात्र, हा विकास होत असताना सामान्य कार्यकर्त्यांनाही न्याय मिळणे गरजेच आहे, त्यामुळे ‘राजा हा राजाच्या पोटी नव्हे, तर मतपेटीतून जन्माला यावा’ असे सांगणारे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारला अनुसरून आम्ही हे सदर सुरु केले आहे.

अश्याच पद्धतीने तुमच्या भागात असणाऱ्या राजकीय घराणेशाहीची माहिती तुम्ही आम्हाला पाठवू शकता. आमच्या [email protected] या मेलआयडीवर आपण हि माहिती पाठवा. सत्यता पडताळून आम्ही तुमचे नाव गुप्त ठेवून बातमीला प्रसिद्धी देऊ.

लोकशाहीतील घराणेशाही भाग एक : तटकरे कुटुंबीय

 Loading…


Loading…

Loading...