fbpx

लोकशाहीतील घराणेशाही भाग – ४ : शरद पवार आणि त्यांचे कुटुंबीय

टीम महाराष्ट्र देशा : राजा हा राजाच्या पोटी नव्हे तर मतपेटीतून जन्माला यावा असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हटले आहे. परंतु आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत घराणेशाहीने लोकशाहीला सुरुंग लावल्याचं दिसत आहे. देशातील सर्वच पक्ष घराणेशाहीला आमचा विरोध आहे सांगतात परंतु प्रत्यक्षात मात्र परिस्थिती उलट असल्याचं दिसून येत आहे.

भारत हा लोकशाहीप्रधान देश आहे परंतु राजकीय नेते स्वतःच्या स्वार्थासाठी घराणेशाहीचा सर्रास वापर करताना दिसून येत आहे. कोणत्याही परिस्थितीत सत्ता आपल्याच घरात टिकून रहावी म्हणून राजकीय मंडळी प्रयत्नशील असतात. आज आपण महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणावर प्रभाव असणाऱ्या शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबाविषयी जाणून घेणार आहोत.महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्रातील अत्यंत प्रभावी व जेष्ठ नेते आहेत. त्यांच्या कुटुंबातील सदस्य राजकारणातील विविध पदांवर कार्यरत आहेत. त्या सर्व सदस्यांविषयी माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

स्व.शारदा पवार : स्व.शारदा पवार या शरद पवार यांच्या मातोश्री. त्या वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी पुणे जिल्हा लोकल बोर्डात निवडून गेल्या होत्या. त्यानंतर त्यांनी रस्त्यांची कामे केली तसेच त्यांनी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून दिली. त्यानंतर त्यांनी जवळपास १४ वर्षे विविध समित्यांमध्ये काम केले.

शरद पवार

शरद पवार : शरद पवार हे देशाच्या राजकारणातील अत्यंत प्रभावी नेते आहेत. तसेच ते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी कॉंग्रेस सरकारच्या काळात केंद्र सरकारमध्ये संरक्षण मंत्री व कृषिमंत्री म्हणून ते कार्यरत होते. तसेच त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणूनही काम पहिले आहे. यासह त्यांनी राज्यात व केंद्रात विविध राजकीय पदांवर काम केले आहे. क्रीडा क्षेत्रात त्यांनी बीसीसीआयचे अध्यक्ष आणि आयसीसीचे अध्यक्ष म्हणूनही काम केले. तसेच त्यांनी शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या एकूणच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्यामुळे त्यांना २०१७ साली पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

अजित पवार : अजित पवार हे शरद पवार यांचे पुतणे आहेत. अजित पवार यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. तसेच राज्य सरकारमधील विविध खात्यांचे मंत्री म्हणूनही त्यांनी काम पहिल्र आहे. तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष या आणि यासारख्या असंख्य राजकीय पदांवर त्यांनी काम केले आहे.

सुप्रिया सुळे : सुप्रिया सुळे या शरद पवार यांच्या कन्या आहेत. गेली अनेक वर्षे त्या राजकारणात सक्रीय आहेत. मागील दोन्ही लोकसभेत त्यांनी बारामती मतदार संघाचं प्रतिनिधित्व केले आहे. २००६ साली सुप्रिया सुळे यांनी राजकारणात पदार्पण केले. तेव्हा त्या पहिल्यांदाच राज्यसभेच्या सदस्या झाल्या. त्यानंतर त्यांनी २००९ मध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती. तसेच त्यांनी विवध राजकीय पदांवर काम केले आहे.

पार्थ पवार : पार्थ पवार हे अजित पवार यांचे सुपुत्र व शरद पवार यांचे नातू आहेत. पार्थ पवार यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतून मावळ मतदारसंघातून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करत आहेत. त्यांची लढत सेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्याशी होत आहे.

रोहित पवार : रोहित पवार हे राजेंद्र पवार यांचे चिरंजीव व शरद पवार यांचे नातू आहेत. ते सध्या जिल्हा परिषद सदस्य आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीत ते कर्जत-जामखेड मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत तसेच ते हडपसर मधूनही निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे .

अशाप्रकारे राज्याच्या व देशाच्या राजकारणावर शरद पवार व त्यांच्या कुटुंबाचं वेगवेगळ्या पदांवर वर्चस्व असल्याच दिसून येत आहे. सर्व नेते आपल्याबाजूने जनतेचा विकास करण्यासाठी काम करत असतात. मात्र, हा विकास होत असताना सामान्य कार्यकर्त्यांनाही न्याय मिळणे गरजेच आहे, त्यामुळे ‘राजा हा राजाच्या पोटी नव्हे, तर मतपेटीतून जन्माला यावा’ असे सांगणारे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारला अनुसरून आम्ही हे सदर सुरु केले आहे.

अश्याच पद्धतीने तुमच्या भागात असणाऱ्या राजकीय घराणेशाहीची माहिती तुम्ही आम्हाला पाठवू शकता. आमच्या [email protected] या मेल आयडीवर आपण ही माहिती पाठवा. सत्यता पडताळून आम्ही तुमचे नाव गुप्त ठेवून बातमीला प्रसिद्धी देऊ.