सर्वोच्च न्यायालय : रमजानच्या काळात मतदान पहाटे 5 वाजता ?

टीम महाराष्ट्र देशा : येत्या काही दिवसातच रमजान ईद निमित्त मुस्लीम बांधवांचा महिनाभराचा उपवास सुरु होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाकडून रमजानच्या काळात मतदान प्रक्रिया पहाटे 5 वाजता सुरू करणं शक्य आहे का? अशी विचारणा निवडणूक आयोगाला करण्यात आली आहे. याआधी देखील एमआयएमकडून रमजानच्या काळात निवडणुका होऊ नयेत असं म्हटलं जात होतं.

रमजानच्या उपवासा निमित्त सर्वोच्च न्यायलयामध्ये याबाबत एक याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावरील सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगला पहाटे ५ च्या सुमारास मतदान घेता येईल का ? अशी विचारणा करण्यात आली आहे. मात्र याबाबतचा सर्व निर्णय हा निवडणूक आयोगाच्या हातात आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप सर्वोच्च न्यायालय करू शकत नाही.

तसेच सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या याचिकेमध्ये केवळ रमजानच नाही तर वाढत्या गर्मीचा देखील विचार व्हावा असं म्हटलं आहे. कारण यावर्षीचा उन्हाळा हा चांगलाच तीव्र असल्याने मतदार हे मतदाना कडे पाठ फिरवताना दिसत आहेत. त्यामुळे शहरी भागात मतदानाचा टक्का चांगलाच घसरला आहे. त्या अनुषंगानेचं रमजान बरोबरच वाढत्या उष्णतेचा देखील विचार करण्यात यावा असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान सपाचे आमदार अबु आझमी यांनी रमजानच्या काळात मतदान करणं मुस्लिमांना कठीण आहे. रमजानच्या काळात मतदान कमी होईल. त्याचा फायदा हा भाजपला होणार असल्याचं आझमी यांनी म्हटलं आहे. लखनऊमधील मौलानांनी देखील रमजानच्या काळात होणाऱ्या निवडणुकांबाबत आपली नाराजी व्यक्त केली आहे.Loading…
Loading...