गणेशोत्सव काळात वाहतूक व्यवस्थेसाठी दोन हजार कर्मचारी तैनात

पुणे : शहरात गणेशोत्सव साजरा करताना वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये यासाठी पुणे शहर वाहतूक पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून या काळात पुणे शहरात एक पोलीस उपयुक्त, चार सहायक पोलीस उपयुक्त, १०४ अधिकारी, १३९६ कर्मचारी आणि ५०० स्वयंसेवक बंदोबस्तासाठी नेमण्यात आले आहेत, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त अशोक मोराळे यांनी दिली. पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ४६२३ मंडळे गणेशोत्सव साजरा करतात. यातील ६१२ मंडळे लक्ष्मी रोड, केळकर रोड, कुमठेकर रोड आणि टिळक रोडवरील विसर्जन मिरवणुकीत सामिल होत असतात. गणेशोत्सवादरम्यान विविध मंडळांनी साजरे केलेले देखावे पाहण्यासाठी आणि विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी बाहेरगावाहून मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. त्यांनी आणलेल्या वाहनांमुळे वाहतुक कोंडी होऊ नये यासाठी हे कर्मचारी उपाययोजना करतील, अशी माहिती मोराळे यांनी दिली.