भाजपा सरकारच्या काळात महाराष्ट्रात पोलिसांचा दबदबा होता; चंद्रकांतदादांचा दावा

भाजपा सरकारच्या काळात महाराष्ट्रात पोलिसांचा दबदबा होता; चंद्रकांतदादांचा दावा

चंद्रकांत पाटील

पुणे – कोथरूड मतदारसंघातील हॅप्पी कॉलनी- गोसावी वस्तीतील नागरिकांना काही समाजकंटकांच्या त्रासाला वारंवार सामोरे जावे लागत होते. त्यामुळे या प्रकारांना आळा घालण्याची मागणी स्थानिकांकडून आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे वारंवार करण्यात येत होती. त्यानंतर  पाटील यांनी याचा पाठपुरावा सुरू केला. यासंदर्भात आयुक्त अमिताभ गुप्ता आणि उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांच्यासोबत बैठक घेऊन, तोडगा काढण्याची मागणी केली होती. तसेच सदर ठिकाणी पोलीस चौकी उभारुन, येथील नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी अशी आग्रही मागणी आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे केली होती. याशिवाय सदर पोलीस कर्मचाऱ्यांना लोकसहभागातून वेतन देण्याची तरतूद करु, असेही पाटील यांनी आयुक्तांना आश्वास्त केले होते.चंद्रकांतदादांच्या आग्रही मागणीमुळे सदर ठिकाणी पोलिस चौकी उभारण्यात आली असून, याचे लोकार्पण पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते बुधवारी झाले.

या कार्यक्रमाला पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, उपायुक्त पौर्णिमा गायकवाड, सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील पवार, अलंकार पोलीस चौकीच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रतिभा जोशी, स्थानिक नगरसेवक दीपक पोटे, पुणे शहर भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर, कोथरूड मंडल अध्यक्ष पुनित जोशी, सरचिटणीस गिरीश भेलके, कोथरूड मंडल महिला मोर्चा अध्यक्षा हर्षदा फरांदे, स्विकृत सदस्या अॅड. मिताली सावळेकर, युवा मोर्चाचे दीपक पवार, प्रभाग १३ चे अध्यक्ष राजेंद्र येडे, सरचिटणीस बाळासाहेब धनवे, निलेश गरूडकर, हॅप्पी कॉलनी फेडरेशनचे अध्यक्ष संजय मिसाळ, कार्यध्यक्ष चारुचंद्र गोडबोले, सचिव चिन्मय गोगटे, कोषाध्यक्ष रामभाऊ नेऊरगावकर, सहसचिव अवधूत जोहारी, सहकोषाध्यक्ष मिलिंद फडके, सदस्य सुरेश मालशे, विनीत गोखले, योगेश देशमुख, सौरभ अथणीकर, शाभवी गारगोटे, मिलिंद ओगले, मालवकर मॅडम, प्रमोद कृष्णकुमार, रोहित पटवर्धन, हिमाली पटवर्धन आदी उपस्थित होते.

हॅप्पी कॉलनी-गोसावी वस्ती भागात पोलीस चौकी उभारण्यासाठीच्या मान्यतेनंतर पाटील यांनी पुणे शहर भाजपा सरचिटणीस वा स्थानिक नगरसेवक दीपक पोटे यांना पोलीस चौकी उभारण्यासाठी आपला विकासनिधी उपलब्ध करून देण्याची सूचना केली होती. त्यानुसार पोटे यांनी तात्काळ निधी उपलब्ध करून दिला. यानंतर पोलीस चौकीची उभारणी केली. त्यानुसार आज याचे लोकार्पण संपन्न झाले.आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वचनपूर्तीवर स्थानिकांनी समाधान व्यक्त केले.

पोलिस चौकीच्या लोकार्पणानंतर बोलताना  पाटील म्हणाले की, भाजपा सरकारच्या काळात माननीय देवेंद्रजींनी पोलीस सक्षमीकरणावर भर दिला. यासाठी पोलीस विभागातील बदल्यांसाठी कोणीही येऊ नये, असा आग्रह धरला. त्यांच्या मते पोलिसांना त्यांच्या गुणवत्तेनुसारच पोस्टिंग मिळावे. त्यासाठी त्यांनी स्वतंत्र मंडळ स्थापन करुन गुणवत्तेनुसार पोलीस बदल्या केल्या. त्यामुळे भाजपा सरकारच्या काळात पोलिसांच्या कामात हस्तक्षेप होत नव्हता. म्हणूनच भाजपा सरकारच्या काळात महाराष्ट्रात पोलिसांचा सर्वत्र दबदबा होता.ते पुढे म्हणाले की,  भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी हे हिंदू संस्कृतीचे पाईक आहेत. हिंदू संस्कृतीत एकमेकांना मदत करण्याची शिकवण दिली जाते. हिंदू म्हणजे प्रेम, आपुलकी, दुसऱ्याला मोठं करण्यात आनंद मानणं आहे.

अलंकार पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रतिभा जोशी म्हणाल्या की, ज्याप्रमाणे कोथरूड पोलीस चौकीचे काम पाहात असताना इथल्या नागरिकांना शंभर टक्के न्याय दिला, त्याप्रमाणे अलंकार पोलीस चौकीच्या हद्दीतील नागरिकांना ही न्याय देणार. त्यामुळे नागरिकांना कधीही कोणतीही अडचण आल्यास त्यांनी तात्काळ मला संपर्क साधावा, त्यांना लगेच मदत मिळेल.

भाजपा सरचिटणीस दीपक पोटे म्हणाले की, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांसाठी नेत्यांची इच्छा ही आज्ञा असते. त्यामुळे माननीय चंद्रकांतदादा पाटील यांच्या आदेशानंतर सहा महिन्यांत मी स्वतः पाठपुरावा करुन सर्व परवानग्या मिळवून ही पोलीस चौकी उभारली आहे. तर प्रवक्ते संदीप खर्डेकर म्हणाले की,  भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणजे बोले तैसा चाले त्याची वंदावी पाउले, असे आहेत. त्यामुळे असा नेता आपल्यला लाभला हे सर्व कोथरुडकरांठी अभिमानाचे आहे.पोलीस आयुक्तांनी गुंडाच्या टोळ्यांना मोका लावून जेरबंद करण्याचा सपाटा लावला आहे, त्यामुळे या भागातील समाजकंटकांवर पोलिस कारवाई ची जरब बसून ते गैरकृत्य करण्यास धजावणार नाही असे वाटते, असेही ते म्हणाले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुणे शहर भाजपा सरचिटणीस दीपक पोटे यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा. अनुराधा एडके यांनी केले. प्रभाग क्रमांक १३ चे अध्यक्ष राजू येडे यांनी सर्वांचे आभार मानले.

महत्वाच्या बातम्या