प्रशासक पांडेय यांच्या कार्यकाळात ठरावांची लपवाछपवी? नेमके काय आहे प्रकरण..

प्रशासक पांडेय यांच्या कार्यकाळात ठरावांची लपवाछपवी? नेमके काय आहे प्रकरण..

astik kumar

औरंगाबाद : गेल्या दोन वर्षांपासून औरंगाबाद महापालिकेत प्रशासकीय राज आहे. मात्र प्रशासकीय कार्यकाळात पारदर्शक कारभारांचा दावा केला जात असला तरी ठरावांची मात्र लपवा-छपवी केली जात असल्याचे समोर आले आहे. प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी गेल्या महिनाभरात २२ ठराव मंजूर केले आहेत. यातील एक ठराव रचना विभागाचे प्रभारी निवृत्त उपसंचालक जयंत खरवडकर(Jayant kharvadkar) यांना पुर्ननियुक्ती देण्याचा आहे. उर्वरित २१ ठरावांची माहिती देण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे या ठरावात दडलय काय? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

आपल्या कार्यकाळात आस्तिककुमार पांडेय(Astik kumar pandey) यांनी आत्तापर्यंत दोनशे पेक्षा अधिक ठराव मंजूर केले आहेत. त्यात कोविड काळात उपाय-योजना करण्यासह, अधिकाऱ्यांना पदोन्नती, निवृत्त अधिकाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने कामावर घेणे, यासह इतर महत्त्वांच्या ठरावांचा समावेश आहे. पूर्वी सर्वसाधारण सभेसाठी विषयपत्रिका काढून ती नगरसेवकांना पाठविली जायची. पण प्रशासकीय काळात ठराव गुपचूप मंजूर केले जात आहेत.

विषयांचे गठ्ठे एकाच वेळी बाहेर येत आहेत. नगर विकास विभागाचे सचिव दिलीप सूर्यवंशी निवृत्त झाल्यानंतर प्रशासकांनी या विभागाचा पदभार उपायुक्त अपर्णा थेटे(Aparna thete) यांच्याकडे दिला आहे. गेल्या महिनाभरात २२ ठराव घेण्यात आले आहेत. पण यातील एकाही ठरावाची माहिती समोर आलेली नाही. नगर रचना विभागाचे निवृत्त प्रभारी उपसंचालक जयंत खरवडकर यांना पुर्ननियुक्ती देण्याच्या ठराव प्रशासनाने गुपचूप घेतला आहे.

यासंदर्भात माजी महापौर त्र्यंबक तुपे(Trimbak tupe) यांनी नगर विकास विभागाकडे तक्रार केल्यानंतर अशा ठराव झाला असल्याचे समोर आले. या ठरावाविषयी विचारणा केली असता, आस्थापना विभागाने ठरावाची प्रत आणली आणि त्यावर नंबर टाकून परत नेली, असे नगर सचिव विभागातून सांगण्यात आले. तर आस्थापना विभागाने आम्ही ठराव तयार केला होता, तो नगर रचना विभागाला पाठविण्यात आला. आता त्याची प्रत आमच्याकडे नाही, असे सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या