भाजप सरकारच्या काळात महाराष्ट्र गुंतवणुकीत पिछाडीवर – सचिन सावंत

Maharashtra-Congress-spokesman-Sachin-Sawant

मुंबई : काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र सतत अग्रेसर होता. देशातील एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी एक तृतियांश गुंतवणूक महाराष्ट्रात यायची. परंतु, भाजप-शिवसेनेच्या काळात महाराष्ट्रातील गुंतवणुकीचे प्रमाण वेगाने घसरले असून,यंदा सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्र तिस-या क्रमांकावर घसरला आहे. असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे. सावंत यांनी आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गुंतवणुकीबाबत केल्या जाणाऱ्या राज्य सरकारच्या दाव्यांची पोलखोल केली.

यासंदर्भात माहिती देताना ते म्हणाले की, केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रिअल पॉलिसी अँड प्रमोशनने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, २०१५ मध्ये गुजरातेत ६३ हजार ८२३ कोटी, छत्तीसगडमध्ये ३६ हजार ५११ कोटी, कर्नाटकात ३१ हजार ५४४ कोटी तर महाराष्ट्रात ३२ हजार ९१९ कोटी रूपयांची गुंतवणूक प्रस्तावित होती. २०१६ मध्ये कर्नाटकमध्ये १ लाख ५४ हजार १३१ कोटी, गुजरातेत ५३ हजार ६२१ कोटी तर महाराष्ट्रात ३८ हजार ०८४ कोटी रूपयांच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव आले. २०१७ च्या जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीमध्ये कर्नाटकात १ लाख ४७ हजार ६२५ कोटी रूपये, गुजरातमध्ये ६५ हजार ७४१ कोटी तर महाराष्ट्रात २५ हजार १८ कोटी रूपयांच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव आले. यंदाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात गुजरातच्या तुलनेत जेमतेम एक तृतियांश गुंतवणुकीचे प्रस्ताव आले आहेत. पूर्वी गुजरात महाराष्ट्रापेक्षा किती तरी पिछाडीवर असायचा.

परंतु, विद्यमान सरकारच्या नाकर्तेपणाचा गुजरात लाभार्थी असल्याचे दिसून येत असल्याची मार्मिक टीका सचिन सावंत यांनी केली. देशातील गुंतवणुकीच्या तुलनेत २०१५ मध्ये महाराष्ट्रात १०.७ टक्के, २०१६ मध्ये ९.२८ टक्के तर २०१७ च्या सप्टेंबर महिन्यापर्यंत केवळ ७.५३ टक्के इतकी गुंतवणूक आली आहे. ही आकडेवारी महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्राची अधोगती सांगण्यास पुरेशी आहे. केंद्रीय उद्योग मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, सन २००० ते २०१२ या काळात देशातील थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्रात एकूण ६१.१३ बिलियन डॉलर्सची गुंतवणूक झाली होती व देशाच्या तुलनेत हे प्रमाण तब्बल ३३ टक्के होते. राज्यात २०१०-११ मध्ये २७,६६९ कोटी, २०११-१२ मध्ये ४४,६६४ कोटी व २०१२-१३ मध्ये ३५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. त्या काळात देशभरातील एकूण गुंतवणुकीपैकी गुजरातचा वाटा केवळ ५ टक्के होता. यावरून महाराष्ट्रात भाजप-शिवसेना सरकार आल्यानंतर गुंतवणुकीत मोठी पिछेहाट झाल्याचे स्पष्ट होते, असे सचिन सावंत पुढे म्हणाले.Loading…
Loading...