नामवंत ब्रॅण्डच्या शाम्पूची नक्कल करणारी टोळी गजाआड

पुणे : नामवंत ब्रँडचे नाव वापरून बनावट शाम्पू विकणाऱ्या उत्तर प्रदेशच्या एका टोळीला गजाआड करण्यात आले आहे. पुणे गुन्हे अन्वेषण विभाग आणि औषध व अन्न सुरक्षा विभागाकडून करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी सुमारे दीड लाखांचा माल जप्त केला आहे.

 निजामुद्दीन बशीरखान उस्मानी (वय 30) , इफूर खान अली सय्यद(वय 19), इसाक खान शमशुद्दीन लोधी (वय 23), नाझीम नूर हसन तेली( 25) सर्व मूळचे उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहेत. पिंपरीच्या वल्लभनगर येथून अटक करण्यात आली आहे. मागील महिन्यात बनावट शाम्पू व सौंदर्य प्रसाधने विकणारी टोळी मोठ्या मुद्देमालासह मुंबईमध्ये अटक करण्यात आली होती.

यामध्ये लोरीयल, सनसिल्क, हेड अँड शोल्डर्स, क्लिनिक प्लस, ट्रेसमी, हिमालया, पॅन्टीन, बाबा रामदेवांचा पतंजली शाम्पूचीही नक्कल करण्यात आल्याचे उघड झाले आहे. या कारवाईत बनावट शाम्पूच्या एक लाख 53 हजार रुपयांच्या सुमारे 842 बॉटल्स जप्त करण्यात आल्या.