fbpx

‘जलयुक्त’मुळे महाराष्ट्राला दुष्काळ भेडसावणार नाही – परिवहनमंत्री दिवाकर रावते

पंढरपूर : जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण आणि शेततळे या योजनांमुळे यापुढे भविष्यात महाराष्ट्राला कधीही दुष्काळ भेडसावणार नाही, असा विश्वास परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी व्यक्त केला.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे आयोजित ‘संवाद वारी’ कार्यक्रमाचा समारोप आणि पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात कृषी पंढरी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. जलसंपदामंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री विजय देशमुख, विठ्ठल रूक्मिणी मंदीर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, आमदार सुरेश धस, प्रशांत परिचारक, विभागीय आयुक्त दिपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले आदी उपस्थित होते.

संवादवारीने राज्य शासनाच्या योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली आहे. चित्रप्रदर्शन, शाहीरी पोवाडे आणि पथनाट्यांच्या माध्यमातून योजना सर्वांपर्यत पोहोचतील. राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी अनेक योजना राबविलेल्या आहेत, जलयुक्त शिवार अभियानातून अनेक गावे दुष्काळमुक्त झाली असून, येणाऱ्या कालावधीत राज्याला दुष्काळ भेडसावणार नाही, असा विश्वासही परिवहनमंत्री रावते यांनी व्यक्त केला.

‘संवादवारी’ उपक्रमाच्या माध्यमातून लाखो वारकऱ्यांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्यात आल्या आहेत. कलापथक, पथनाट्य, चित्ररथ व चित्रप्रदर्शनाच्या माध्यमातून अत्यंत प्रभावीपणे योजना पोहोचविण्याचे काम सर्व कालाकारांनी केले आहे. पंढरपूर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात योजनांचे चित्रप्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचा सर्व वारकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महासंचालनालयाच्या वतीने यावेळी करण्यात आले.

यावेळी उपस्थितांना संवादवारी उपक्रमाची चित्रफीत दाखविण्यात आली. तर लोकराज्य मासिकाच्या वारी विशेषांकाच्या ध्वनीफितीचे अनावरण करण्यात आले. यावेळी प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. माजी आमदार व ज्येष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष दिलीप घाडगे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

संवादवारीची ठळक वैशिष्टे

  • आळंदी ते पंढरपूर आणि देहू ते पंढरपूर या दोन्ही मार्गावर पालख्यांबरोबर शासकीय योजनांबाबत वारकऱ्यांशी संवाद साधणारे उपक्रम राबविण्यात आले.
  • चित्ररथ, प्रदर्शन ,एलईडी व्हॅन, लोककला,पथनाट्य उपक्रम राबविण्यात आले.
  • दोन्ही मार्गावर २४ ठिकाणी प्रदर्शन भरविण्यात आले.प्रत्येक ठिकाणी एक ते दोन दिवसाचे प्रदर्शन होते. एका प्रदर्शनात सुमारे ४० पॅनल्स होते.
  • या प्रदर्शनात जलयुक्त शिवार,शेततळे,गाळमुक्त धरण,शेती ,पाणी आणि वीजपुरवठा आदी योजनांची आणि योजनांच्या अंमलबजावणीची सविस्तर माहिती सोप्या भाषेत देण्यात आली आहे.