‘या’ कारणामुळे आसेगाव येथील सरपंचाचे पद जिल्हाधिकाऱ्यांनी केले रद्द

औरंगाबाद : गंगापूर तालुक्यातील आसेगाव ग्रामपंचायत येथील सरपंचाचे पद गुरुवारी (दि.१०) जिल्हाधिका-यांद्वारे रद्द करण्यात आले असून तत्कालीन निर्वाचन अधिकारी यांच्यावर नियमभंग केल्या प्रकरणी कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत.

गंगापूर तालुक्यातील आसेगाव ग्रामपंचायत सरंपचपदाची जागा ही एससी महिला प्रवर्गासाठी राखीव होती. तत्कालीन निर्वाचन अधिकारी डी.जी.पगार होते. याठिकाणी सविता राजगुरु आणि गिरीजा बागूल या दोन सदस्य एससी महिला प्रवर्गातील सदस्या होत्या. वास्तविक सविता राजगुरु यांचा मूळ प्रवर्ग हा एससी आहे. मात्र त्या खुल्या प्रवर्गातुन निवडून आल्या या कारणाने निर्वाचन अधिकारी पगार यांनी त्यांचे नामनिर्देशन पत्र रद्द केले. तसेच ८ फेब्रुवारी २०२१ तारखेची विशेष सभा रद्द करण्यात आली. आणि ९ फेब्रुवारीला सविता राजगुरु यांनी उच्च न्यायालयात याप्रकरणी दाद मागितली.

त्यावर उच्च न्यायालयाने दुपारी २.४५ वा. सविता राजगुरु यांचे नामनिर्दैशन पत्र स्विकारण्यात यावे,असे आदेश दिले होते. सदरच्या आदेशाबाबत निर्वाचन अधिकारी पगार यांना संबंधित सरकारी अभियोक्ता तसेच राजगुरु आणि गंगापूर तहसिलदार यांनी कळविले होते. मात्र तरी सुद्धा साडेतीन वाजता बैठक पुन्हा सुरु झाल्यावर उच्च न्यायालयाचे आदेश असतानाही पगार यांनी राजगुरु यांचे नामनिर्दैशन पत्र स्विकारले नाही. तसेच गिरीजा बागुल यांना बिनविरोध सरपंच घोषित केले.

त्यामुळे सविता राजगुरु यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे निवडणूकीच्या वैधतेबाबत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम ३३(५) अन्वये विवाद उपस्थित केला. या प्रकरणात सर्व संबंधितांची सुनावणी घेऊन जिल्हाधिकारी यांनी सरपंच पदाच्या निवडणूकीत निर्वाचन अधिकारी पगार यांनी गैरप्रकार केल्याने आणि उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याने सदर निवडणूकीची प्रक्रिया अवैध ठरवली असून ग्रामपंचायतीचे सरपंच रिक्त घोषित केले आहे. तसेच तहसलिदार गंगापूर यांना सदर सरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया नव्याने घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच जिल्हाधिकारी यांनी संबंधित निर्वाचन अधिकारी पगार यांनी या निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार केल्यामुळे यांच्यावर खातेनिहाय कारवाईचे निर्देश दिले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

IMP