आसनगाव येथे दुरांतो एक्सप्रेसचे डबे घसरल्याने मनमाड कुर्ला एक्सप्रेस रद्द

नागपूर मुंबई एक्सप्रेसचे ९ डबे आसनगाव येथे घसरल्याने मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली असून मनमाड कुर्ला गोदावरी एक्सप्रेस आज रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे चाकरमान्यांचे खूप हाल झाले. त्यामुळे मनमाड, लासलगाव येथील चाकरमान्यांनी नाशिककडे जाण्यासाठी बसचा पर्याय निवडला असून काहीनी आज कामावर सुट्टी घेण्याची वेळ आली आहे.

आज सकाळी दुरांतो एक्सप्रेसचा अपघात झाल्याने मनमाड वरून सुटणारी मनमाड कुर्ला गोदावरी एक्सप्रेस रद्द करण्यात आली. सकाळी पंचवटी व राज्यराणी एक्सप्रेस इगतपुरी पर्यत पोहचली असून तेथूनच ती परत वळविण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तसेच नागपूर वरून सुटणारी नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस मनमाड रल्वे स्थानकावर उभी करण्यात आली आहे.

तर लासलगाव रेल्वे स्थानकावर गरीबरथ एक्सप्रेस थांबविण्यात आली आहे. आज सकाळी लासलगाव रेल्वे स्थानकावर गोदावरी एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या चाकरमाने व प्रवासी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी केली होती. मात्र गोदावरी एक्सप्रेस रद्द करण्यात आल्याने त्यांना परत जावे लागले.