राजकीय अंतर्गत मतभेदामुळे ‘चान्नी’ गावचा विकास खोळंबला

channi village

विठ्ठल येणकर, पातुर/चान्नी : तालुक्यातील मुख्य आणि उत्पनाच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या  ‘चान्नी’ गावचा विकास खोळंबला आहे. गावातील अंतर्गत राजकीय मतभेदामुळे विकासकामांना केराची टोपली दाखवली जात असून ग्रामपंचायत मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे.

चान्नी आठवडी बाजाराची विक्री ५ लाखापर्यंत होते. मात्र बाजारात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, गुरांसाठी देखील पाणी नाही. बाजारात विहीर तर आहे मात्र ती सध्या व्यापाऱ्यांसाठी भीतीचे केंद्र बनली आहे. तसेच  व्यापाऱ्यांना माल ठेवण्यासाठी शेडची व्यवस्था नाही. त्यामुळे तापत्या उन्हात त्यांना माल विकावा लागतो.

आठवडी बाजारामुळे पाच वर्षामध्ये जवळपास २० लाख उत्पन येते. मात्र त्या तुलनेत बाजाराचा कोणताच विकास झालेला नाही. गावातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार आठवडी बाजारातील विहारींमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे. तक्रार केली असता कोणत्याही प्रकारची चौकशी होत नाही.

या संदर्भात चान्नी गावाचे सरपंच सौ. सुनिता बंडू राखोंडे यांच्या संपर्क साधला असता. “पुढील दोन महिन्यात बाजारातील पाण्याची व्यवस्था, तसेच स्वच्छता गृहाचे कामे पूर्ण करू” असे आश्वासन त्यांनी  दिले आहे.