पंकजा मुंडे यांच्यामुळे वैद्यनाथ’ घटनेतील मयतांच्या नातेवाईकांना मिळाला खरा आधार

परळी – घरातील कर्ता व्यक्ती गमावल्यानंतर त्या कुटूंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळतो अशा परिस्थितीत त्यांना धीर देत त्यांचा खरा आधार बनण्याचे काम राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री  पंकजाताई मुंडे यांनी केले आहे. वैद्यनाथ साखर कारखान्याच्या घटनेतील मयतांच्या वारसांना त्यांनी वैयक्तिक मदत तर केलीच शिवाय स्वतः प्रयत्न करून मुख्यमंत्री सहायता निधीतूनही प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना ५० हजाराची मदत मिळवून दिली. आज या मदतीचे धनादेश गोपीनाथ गडावर देवून त्यांनी लोकनेत्याला साजेसे असे काम केले.

गतवर्षी वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात घडलेल्या घटनेत कांही कर्मचा-यांचा मृत्यू झाला तर कांही जण जखमी झाले होते. पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी त्यांच्या कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात सहभागी होवून काळजी करू नका, मी तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे अशा शब्दांत त्यांना धीर देत तातडीने सर्वतोपरी मदत केली होती. या घटनेत फक्त कारखान्याने आर्थिक मदत देणे अपेक्षित आहे ते त्यांनी दिलेच पण त्यांच्या सूचनेनुसार वैद्यनाथ बॅक, जिल्हा मध्यवर्ती बँकेसह इतरही काही संस्थांनी मदतीचा हात पुढे केला, शिवाय गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीनेही प्रत्येकी एक लाख रुपये त्यांनी वारसांना देवून मोठा आधार दिला होता.

ना. पंकजाताई मुंडे यांनी मयत व जखमींच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळवून देण्याचा शब्द दिला होता तो आज त्यांनी पुर्ण करून लोकनेत्याला साजेसे असे काम केले. गोपीनाथ गडावरील लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीस्थळा समोर आज सकाळी झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात त्यांनी मयतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी दोन लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी ५० हजाराचे धनादेश सुपूर्द केले. यावेळी उपजिल्हाधिकारी गणेश महाडीक, तहसीलदार शरद झाडके, कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेवराव अघाव, वैद्यनाथ बँकेचे अध्यक्ष अशोक जैन, कारखान्याचे कार्यकारी संचालक जी. पी. एस. के. दीक्षितुलू आदी उपस्थित होते.