नगरमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीवर ड्रोन कॅमे-याव्दारा निगराणी

अहमदनगर : नगरमध्ये श्री गणेश विसर्जनासाठी मिरवणूक निघणार असून या मिरवणुकीसाठी यंदाच्या वर्षी पोलिसांनी प्रचंड बंदोबस्ता बरोबरच सीसीटीव्ही व ड्रोन कॅमे-याचा वापर करण्याचे नियोजन केले आहे. संपूर्ण मिरवणुकीचे ड्रोनव्दारे चित्रीकरण केले जाणार आहे. नगरमध्ये विसर्जन मिरवणुकीसाठी प्रथमच ड्रोन कॅमे-याचा वापर केला जाणार आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त अधिक्षक घनश्याम पाटील विसर्जन मिरवणुकीच्या बंदोबस्ताचे नियंत्रण करणार आहेत.

बंदोबस्तासाठी सुमारे 700 पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.शहर विभागाने सहाय्यक पोलीस अधिक्षक अक्षय शिंदे स्वत: मिरवणुकीत बंदोबस्ताच्या टीमचे नेतृत्व करणार आहेत त्यांच्यासोबत एक उप विभागीय पोलीस अधिकारी,13 पोलीस निरीक्षक,उपनिरीक्षक व राज्य राखीव पोलीस दलाची एक प्लाटून बंदोबस्तासाठी तैनात असणार आहे.शहरातील रामचंद्र खुंट येथून दुपारी 12 वाजता मिरवणुकीस प्रारंभ होणार असून सायंकाळी 6 वाजता मानाचा गणपती असलेल्या माळीवाडा विशाल गणपतीचा रथ दिल्ली दरवाजा बाहेर पड़णार आहे.

मिरवणुकीत एकूण 15 सार्वजनिक गणेश मंडळांचा सहभाग असणार आहे. संपूर्ण मिरवणुकीच्या मार्गावर सातत्याने निगराणी करण्यासाठी एकूण 55 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येथ आहेत.या कॅमेर्यांमध्ये केले जाणारे चित्रीकरण सतत पाहाण्यासाठी 10 ठिकाणी टीव्ही स्क्रीन बसविण्यात येणार असल्याने पोलिसांना अतिशय बारकाईने मिरवणुकीवर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे.

पोलीस विभागाने बसविलेले कॅमेरे हे अतिशय उच्च दर्जाचे असल्याने रात्रीच्या वेळी कमी प्रकाशात देखील त्यामध्ये चांगल्या दर्जाचे चित्रीकरण करणे शक्य होणार आहे.त्याबरोबरच यंदा प्रथमच विसर्जन मिरवणुकीच्या वेळी पोलिसांनी ड्रोन कॅमे-याचा वापर करण्याचे ठरविले आहे.विसर्जन मिरवणुकीच्या सुरूवाती पासून रात्री उशीरा पर्यंत ड्रोन कॅमेरे कार्यरत राहाणार आहेत.

विशेषत: ज्या ठिकाणी राजकीय नेते गणपती मिरवणुक पुढे नेण्याच्या विषयावरून पोलिसांशी हुज्जत घालतात तसेच वाद निर्माण करतात,अशा सर्वच ठिकाणी यंदाच्या वर्षी पोलिसांची बारीक नजर असणार आहे.त्या बरोबरच विविध चौकांमध्ये टेहाळणी मनोरे उभे करून त्यावरून पोलीस कर्मचारी दुर्बिणीच्या सहाय्याने मिरवणुकीवर निगराणी करणार आहेत. अहमदनगर शहराबरोबरच जिल्ह्याच्या ग्रामीण भागात देखील मंगळवारी श्री गणेश विसर्जनाच्या मिरवणुका काढण्यात येणार आहेत.

जिल्ह्यातील नेवासे,श्रीरामपूर,संगमनेर,जामखेड,कोपरगाव शहर ही पोलीस ठाण्यांच्या क्षेत्रात संवेदनशील असल्या कारणाने मोठ्या प्रमाणावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.या पांचही पोलीस ठाण्यांच्या क्षेत्रात तब्बल 160 ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आले आहेत.त्यामुळे विसर्जन मिरवणुकी दरम्यान उत्साही कार्यकर्त्यांकडून कोठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जाऊ नये यासाठी पोलीस दल सज्ज झालेले आहे.