#होरपळतोय_महाराष्ट्र : पशु – पक्षी पाण्याच्या शोधात,मुकी जनावरे सोडत आहेत तडफडून प्राण

टीम महाराष्ट्र देशा- अन्न, पाणी न मिळाल्याने 40 हून अधिक मोरांचा तडफडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना चांदवडच्या दहीवड-दीघवड गावात घडली आहे. या घटनेनंतर वनविभागाचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. मोरांच्या संवर्धनासाठी गावकऱ्यांनी पाण्याचे साठे तयार केले होते. परंतु वनविभाग दुर्लक्ष केल्यानेच मोरांचा मृत्यू झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

राज्यभरात सध्या भीषण दुष्काळ पडल्याचे चित्र आहे. भीषण पाणीटंचाईला तोंड देत आहेत असे असले तरीही पाणीटंचाईवर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी प्रशासन, सामाजिक संस्था अथवा लोकप्रतिनिधींकडून सध्यातरी कोणतेही पाऊल उचलले जात नसल्याचे समोर येत आहे.

अश्याच पद्धतीचे चित्र लातूर जिल्यातील उदगीर तालुक्यात पहायला मिळत आहे. या तालुक्यात अनेक विहिरी, तलाव या कोरड्या पडल्या आहेत. परिसरातील सर्वच जलस्त्रोत पूर्णपणे आटल्याने अनेक पक्षी, प्राणी हे पाण्याच्या शोधात गावाजवळ भटकत असतानाचे चित्र पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे. या तीव्र उष्णतेमुळे माणसांबरोबरच मुकी जनावरे, प्राणी-पक्षी यांनाही त्रास सहन करावा लागत आहे.