बेवड्यांच्या ‘आता भाऊ गाडी चालवणार’ला गडकरी लावणार ब्रेक

टीम महाराष्ट्र देशा : मित्रांची ट्रीप असेल आणि आपल्यातला एखादा पिऊन फुल्ल टाईट असेल तर ‘आता भाऊ गाडी चालवणार’ हे वाक्य ठरलेल असत मात्र आता केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अशा भावांना चाप बसवण्यासाठी भन्नाट तंत्रज्ञान भारतात आणण्यासाठी तयारी सुरु केली असून लवकरच हे तंत्रज्ञान भारतात येणार असून दारु पिऊन वाहन चालवत असल्यास गाडीचं इंजिन सुरुच होणार नाही. याबाबतची माहिती नितीन गडकरी यांनी राज्यसभेत बोलत असताना दिली आहे.

वाहन चालकाने सीटबेल्ट न घातल्यास पोलिस नियंत्रण कक्षाला त्याची माहिती आपोआप मिळेल, अशी व्यवस्थाही करण्यात येणार असल्याचंही गडकरींनी सांगितले. यमुना एक्स्प्रेस महामार्गावर झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर राज्यसभेत विचारलेल्या प्रश्‍नाचे उत्तर देताना गडकरी यांनी या नव्या तंत्रज्ञानाची माहिती दिली.

दारु पिऊन बेदरकारपणे गाडी चालविल्यामुळेही अपघात होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळेच अशा प्रकारचे तंत्रज्ञान वाहनामध्ये बसविण्याचा विचार आहे. चालकाने सीट बेल्ट न लावल्यास पोलिस नियंत्रण कक्षाला त्याची आपोआप माहिती मिळेल, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे.