धक्कादायक : बीफ विकत असल्याच्या संशयावरून जमावाकडून 68 वर्षीय व्यक्तीला बेदम मारहाण

गुवाहटी – बीफ विकत असल्याच्या संशयावरून आसाममध्ये जमावाकडून एका 68 वर्षीय व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. समाजकंटक फक्त एवढ्यावरच थांबले नाहीत तर या व्यक्तीला जबरदस्तीने डुकराचे मांसही खाऊ घालण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या दुर्दैवी आणि संतापजनक घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत असून मारहाण करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,,आसामच्या बिश्वनाथ चरैली येथे ७ एप्रिल रोजी ही घटना घडली. शौकत अली असे मारहाण करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. बीफ विकल्याच्या कारणावरुनचं जमावाने शौकतला मारहाण केली असल्याच्या माहितीला पोलिसांनी देखील दुजोरा दिला आहे. दरम्यान, शौकल अली यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान,देशभरात गोरक्षकांनी याच मुद्द्यावरून धुमाकूळ घातल्याच्या विविध घटना समोर येत आहेत. विरोधकांकडून सरकारच्या आशीर्वादानेच या घटना घडत असल्याचा आरोप केला जाता आहे. फेब्रुवारी महिन्यात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी बीफचे जेवण करून विकण्याच्या प्रकरणात एका महिलेचे हॉटेल पेटवून दिल्याची घटना उघडकीस आली होती. कर्नाटकमधील सकलेशपूरमध्ये हॉटेलवर हल्ला चढवून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ते हॉटेल पेटवून दिले होते.