द्रष्टा सुधारक

aagarkar

व्यासपीठ : समाजसुधारक ‘गोपाळ गणेश आगरकर’ हे नाव महाराष्ट्राला परिचित पण तरीही विस्मृतीत गेलेलं. याची कारणं म्हणाल, तर मुख्यत्वे आगरकरांचं अल्पायुष्य आणि समाज सुधारणेमुळे त्यांनी ओढवून घेतलेला समाजाचा रोष! लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या नांवानंतर मराठी माणसाला साहजिकच स्मरायला हवं ते आगरकरांचं रूप.

टिळक आणि आगरकर यांच्यात दुमत होण्याचं कारण राजकीय व सामाजिक सुधारणा, इतकी तरी किमान माहिती प्रत्येकाला असायलाच पाहिजे. पण त्यांच्यातील घनिष्ट मैत्रीमध्ये तेढ निर्माण होण्याचं हे एकमेव कारण नव्हे. सुधारणा दोघांनाही हव्या होत्या. पण टिळकांना भारतीय समाजाची नाडी पक्की ठाऊक होती. लोकांमध्ये राहूनंच लोकजागृती करण्याकडे त्यांचा कल होता. म्हणूनच स्वतःच्या मनाविरुद्ध त्यांनी चहा-ग्रामण्याबद्दल, परदेशवारी बद्दल प्रायश्चित्त घेतलं. उलट लोकांना न जुमानता आगरकरांनी सामाजिक सुधारणा करण्यावर भर दिला; परिणामी त्यांच्यात आणि लोकांमध्ये अंतर पडत गेलं. आगरकर हे तर्कट बुद्धीचे आणि हटवादी, तसेच निश्चयी होते. न्यायमूर्ती रानड्यांचे ते शिष्य. पण आगरकरांनी रानड्यांचं अंधानुकरण कधीच केलं नाही. रानड्यांनी लोकनिंदा टाळण्यासाठी चहाग्रामण्याबद्दलच प्रायश्चित्त घेतलं होतं; मात्र आगरकरांना हा मुत्सद्दीपणा दाखवता येऊनही त्यांनी तो केला नाही. लोकनिंदाही त्यांनी हसतमुखाने स्वीकारली.

खरं पाहता गोपाळ गणेश आगरकर हे विचारी, कष्टाळू, द्रष्टे असले तरी लोकांमध्ये राहून काम करण्याची आशा त्यांनी ठेवली नाही आणि नेमकी तेच त्यांना घातक ठरलं. लोकांमध्ये राहून त्यांच्या अंधश्रद्धा मोडणं, सामाजिक सुधारणा घडवून आणणं याकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. प्रसंगी जनतेचा रोष पत्करूनही, वेळ पडल्यास इंग्रजांना मध्ये घालून, मूठभर सुधारकांनी सुधारणा लादण्यातही त्यांना चूक वाटत नव्हती. कारण सामाजिक सुधारणेविना मिळणारं राजकीय स्वातंत्र्य त्यांना नको होतं. त्यामुळेच टिळक आणि आगरकर वेगळे झाले.

स्वतःच्या विचारांवर ठाम असल्याने या मानी पुरुषाने स्वतःच्या तत्वांसाठी टिळकांविषयी असलेलं आपलं मित्रप्रेम, समाजातील मान-सन्मान कशाचीही तमा बाळगली नाही. पैशांसाठी लोकांच्या सेवेचा बाजार मांडला नाही. त्यामुळेच तर त्यांनी इंदूरच्या होळकरांनी दिलेली ५०० रुपयाची नोकरी साभार नाकारून ४० रुपये पगारावर नोकरी पत्करली. समाज सुधारला पाहिजे ही एकमेव तळमळ, तडफड त्यांना अस्वस्थ करत होती. त्यातही भारतीय स्त्री सर्व बंधनांतून, दास्य-शृंखलांमधून मुक्त झाली पाहिजे याकडे त्यांचा विशेष ओढा होता.

आगरकर हे निधड्या छातीचे, संकटातही हिमालयासारखे निश्चल भासणारे महापुरुष होते. गोपाळ गणेश आगरकरांचं बालपण देशावरील कऱ्हाड गावामध्ये गेलं. गरिबीचे आणि उपासमारीचे सगळे चटके सोसून तावून सुलाखून आगरकरांच्या देशस्थी विचारांना एक वेगळंच तेज प्राप्त झालं होतं. कुणापुढे कधीही हात पसरायचे नाहीत या संस्कारांमुळे आगरकरांचा स्वभाव मानी बनला होता. उच्च शिक्षण घेऊन शिक्षक होऊन समाज सुधारणा करायची हा विचार. पण आई-वडील परिस्थितीने गांजलेले.त्यामुळे त्यांच्याकडून रूपायाचीही अपेक्षा न करता आगरकर मिळेल त्या वाटेने, प्रसंगी चालत कऱ्हाडहून पुण्याला आले. लेख, निबंध लिहून तोकडे पैसे मिळवून डेक्कन महाविद्यालयात कसा बसा प्रवेश घेतला आणि एम ए झाले. डेक्कन महाविद्यालयात त्यांना एक घनिष्ट आणि समविचारी मित्र मिळाला – बळवंतराव (लोकमान्य) टिळक. मालाकार विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या विचारातून आणि बळवंत टिळक, आपटे अशा काही मित्रांना बरोबर घेऊन ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’ची स्थापना झाली. त्यातूनच पुढे न्यू इंग्लिश स्कूल, फर्ग्युसन महाविद्यालय आणि ‘केसरी’ व ‘मराठा’ ही वृत्तपत्र निघाली. आगरकर केसरीचे संपादक झाले.

दरम्यान केसरी आणि मराठा वृत्तपत्रांनी कोल्हापूरचे महाराज छत्रपती यांच्यावर होणाऱ्या अन्यायाबद्दल आवाज उठवला. त्यामुळे टिळक आणि आगरकरांना शिक्षा झाली. तेव्हा समाजकार्याच्या दृष्टीने एकच ध्येय गाठणाऱ्या आपल्या विचारांचा मार्ग वेगवेगळा आहे हे दोघाही द्रष्ट्यानी हेरलं. पुढे अल्पायुषी ठरलेल्या चिपळूणकरांच्या मृत्यूनंतर संस्थेत फाटाफूट होऊन टिळक बाजूला झाले. काहीच महिन्यात केसरी व मराठा वृत्तपत्र डबघाईला आली तेव्हा छापखान्याच्या कर्जासहित टिळकांनी ती विकत घेतली. चिपळूणकरांचं स्वप्न टिळकांनी पुढे साकारण्याचे प्रयत्न सुरू ठेवले. मध्यंतरीच्या काळात टिळकांभोवती सर्व सनातनी, तसेच सर्व जातीय बहुजनांचा ताफा जमा होत होता. आगरकरही न्यायमूर्ती रानड्यांच्या सुधारकी मंडळीत दाखल झाले. तिथून सर्व सुधारक मंडळींना हाताशी घेऊन आगरकरांनी ‘सुधारक’ हे वृत्तपत्र काढलं.

सामाजिक आणि राजकीय सुधारणांविषयी टिळक आणि आगरकर दोघेही आपापले विचार वृत्तपत्रातून मांडत होते. टिळकांनी राजकीय स्वातंत्र्याचा उच्चार केला, तर आगरकरांना स्त्रीप्रश्न, सामाजिक समस्या यांनी पछाडलं होतं. त्यासाठी आगरकरांनी प्रसंगी निर्बंध (कायदे) करून सुधारणा करण्यावर भर दिला. निर्बंध करून सुधारणा लादण्याला टिळकांचा विरोध होता. त्यामुळे आगरकरांनी सुधारक वृत्तपत्रातून आगपाखड करून टिळक आणि त्यांच्या उरल्यासुरल्या मैत्रीला नित्याची तिलांजली दिली. पण समाजसुधारणेचं व्रत घेतलेल्या या महान योग्याने शेवटपर्यंत तोच ध्यास घेतला होता. त्यांनी स्वतःच्या पत्नीवरही कोणतच बंधन घातलं नाही.

आगरकरांना लहानपणापासूनच दम्याचा विकार जडला होता. त्याकाळी दम्यावर कोणतही ठोस असं औषध नव्हतं. त्यामुळे आगरकर त्या काळात दम्याने आजारीच असायचे. आगरकर आजारी असतानाच पुण्यातल्या काही कर्मठ लोकांनी आगरकरांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली, त्यांच्यावर नको ते आरोप केले. पण त्या आजारपणातही आगरकरांनी या लोकांना चांगलच नामोहरम केलं.
आपल्या अंताचा प्रवास सुरु झाला आहे हे द्रष्ट्या आगरकरांना कळून चुकलं होतं. एके ठिकाणी दम्याचा आजार बळावत होता, तर दुसरीकडे घरात पैसा टिकत नव्हता. मात्र तरीही त्यांनी आजवर कुणाचंच कर्ज डोक्यावर ठेवलं नाही. त्यामुळे शेवटच्या दिवसात त्यांनी ३० रुपयांची तरतूद करून ठेवली होती. आपण गेल्यावर जर प्रेताला खांदा द्यायला लोक आले नाहीत तर पुणे महापालिकेने प्रेताचं दहन करावं म्हणून ते तीस रुपये त्यांनी बाजूला ठेवले होते. म्हणजे महापालिकेचंही ऋण नको ही त्यांची दूरदृष्टी. शेवटच्या आजारपणात त्यांनी पत्नी यशोदाकडून वचनं घेतली की, तिने आपल्या मृत्यूनंतर केशवपन करायचं नाही, लाल साडीत वावरायचं नाही, सती जायचं नाही, स्वतः शिकायचं आणि इतर स्त्रियांना शिकवायचं… हे होते आगरकर!

lokmanya tilak 1

आगरकरांना रूग्णशय्येवर असताना मात्र आपल्या एकेकाळच्या जिवाभावाच्या मित्राची (टिळकांची) ओढ लागली होती. आपणच आपली भांडणं चव्हाट्यावर आणली याची सल आगरकरांना टोचत होती, मन कुरतडत होती. ‘टिळकांशी वैर मिटल्याविना मला मरण येणार नाही’ असं ते सारखं पुटपुटत असत. त्यांच्या पत्नी यशोदा आगरकर म्हणतात त्यानुसार टिळक मित्रप्रेमापोटी आगरकरांना भेटायला आले. दोघांच्याही तोंडून शब्द फुटत होते. फक्त घळाघळा अश्रू ओघळत होते. जे शब्दही सांगू शकत नाहीत ते बरंच काही हे अश्रू मूकपणे सांगत होते.दोघा मित्रांच्या या भेटीनंतर आगरकरांनी लगेचच प्राण सोडला.

आपण भोगलेल्या मानहानीमुळे, सहन केलेल्या त्रासांमुळे कदाचित उद्याची भारतीय स्त्री दस्यांतून मुक्त झाली असेल, अशी चित्र पाहत उघड्या डोळ्यांनीच त्यांनी या जगाचा नित्याचा निरोप घेतला. आज इतक्या वर्षांनी का होईना भारतीय स्त्रिया काही प्रमाणात मुक्त झाल्या आहेत. ही पुण्याई द्रष्ट्या आगरकरांचीच! पण दुर्दैवाने गांधीजींच्या, नेहरूंच्या, काँग्रेसच्या नामस्मरणाने ओसंडून वाहणारी इतिहासाची पुस्तकं चिपळूणकर, फडके, टिळक, आगरकर, सावरकर, कर्वे यांच्यासाठी मात्र जेमतेम एकाच ओळीचं पुण्य उपभोगत आहेत – आज ना उद्या या महापुरुषांच्या माहितींनी पवित्र आणि संपन्न होण्याच्या आशेवर!

– आकाश भडसावळे