fbpx

ड्रोन्स वापराच्या नियमावलीचा प्राथमिक मसुदा जाहीर

देशांतर्गत ड्रोन्सच्या वापरासाठीची नवी नियमावली नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने बुधवारी जाहीर केली. ड्रोन इंडस्ट्री देशाच्या विविध प्रकारच्या विकासकामांमध्ये फायदेशीर ठरणार असल्याचे केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री पी. अशोक गजपती यांनी सांगितले. यामध्ये कृषी, तेल आणि नैसर्गिक वायू निर्मितीचा समावेश असल्याचे गजपती म्हणाले.

ड्रोन्सच्या वापरात भारत अग्रगण्य देश म्हणून नावारूपाला यावा, हे आमचे उद्दिष्ट असल्याचे नागरी हवाई राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी म्हटले. तर नागरी हवाई सचिव आर. एन. चौबे म्हणाले, ड्रोन संदर्भातील निर्माण होणाऱ्या सुरक्षाविषयक प्रश्नांवर गृहमंत्रालयाशी चर्चा झाली असून मसुदा नियमावलींमुळे ड्रोन क्षेत्रासाठी ‘इज ऑफ डुईंग बिझनेस’मध्ये सुधारणा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये ड्रोन्सचा गैरवापर होणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे.

नव्या नियमावलीत महत्वाचे मुद्दे

  • नॅनो, मायक्रो, मिनी, स्मॉल आणि लार्ज या पाच प्रकारांच्या ड्रोन्सना भारतात परवानगी देण्यात आली आहे.
  • हे ड्रोन्स २५० ग्रॅम ते १५० किग्रॅ वजनाच्या रेंजमध्ये असतील.
  • २५० ग्रॅमपेक्षा कमी वजन असणाऱ्या ड्रोन्सना सुरक्षाविषयक मंजुरी देण्यात आली आहे.
  • मायक्रो प्रकारच्या (२५० ग्रॅम ते २ किग्रॅ) ड्रोन्ससाठी २ दिवसांत मंजुरी देण्याची तरतुद आहे.
  • नॅनो ड्रोन्सशिवाय इतर ड्रोन्ससाठी हवाई संरक्षण विभागाची परवानगी आवश्यक.
  • २ किलोपेक्षा कमी वजनाच्या ड्रोनला २०० फुट उंचीपर्यंत उडवण्यासाठी एकदा नोंदणी केली की, त्यानंतर त्याला कुठल्याही परवानगीची आवश्यकता भासणार नाही.
  • फोटोग्राफी, वैद्यकीय वापरासाठी, जाहिरातपटाच्या निर्मितीसाठी हे ड्रोन्स वापरता येणार आहेत. त्याचबरोबर ई-कॉमर्स कंपन्यांनाही ड्रोन्स वापरता येणार आहेत.
  • हवाई रिक्षा किंवा प्रवाशी ड्रोन्सना देखील या धोरणांतर्गत परवानगी असणार आहे.