हेलिकॉप्टरमधून फिरणाऱ्या डॉ.सुजय विखेंकडे स्वतःची गाडी नाही

blank

अहमदनगर : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची चर्चा या ना त्या कारणाने सातत्याने देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात होत असते. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर उमेदवार ठरवण्यापासून ते या पक्षातून त्या पक्षात नेत्यांचे जाने असो की, शरद पवार यांच्या हट्टाने विखेंची नाराजी असो, यासह अनेक घडामोडी झाल्या आणि पुढे सातत्याने होताना दिसत आहेत.

हेलिकॉप्टरमधून फिरणारे उमेदवार म्हणून ओळख असणारे सुजय विखे यांच्याकडे प्रत्यक्षात स्वतःच्या मालकीचे एकही वाहन नसल्याचे त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केले आहे. सोमवारी त्यांनी उमेदवारी अर्ज भरला असून या वेळी त्यांनी २८ पानांचे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.

किती आहे डॉ. सुजय विखे यांची संपत्ती ?

आता भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील चर्चेत आलेत ते त्यांच्या संपत्तीच्या विवरणामुळे आले डॉ. सुजय राधाकृष्ण विखे हे 11 कोटी 17 लाखांचे मालक आहेत. तर त्यांच्या पत्नी धनश्री या 5 कोटी 7 लाखांच्या मालकीण आहेत. सुजय यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे कर्ज नाही. पत्नीकडे मात्र प्रवरा बँकेचे 26 लाख 23 हजारांचे कर्ज आहे. विखे यांचे नाव शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये नोंदविले गेले असल्याचे प्रतिज्ञापत्रातून समोर आले आहे. सुजय यांच्याकडे 4 कोटी 91 लाखांची जंगम आणि 6 कोटी 25 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.

गेल्या आर्थिक वर्षात 1 कोटी 68 लाख 40 हजार रुपयांचे उत्पन्न घटून सुजय विखे यांचे वार्षिक उत्पन्न 86 लाख 10 हजार 202 इतके झाले आहे. पत्नीचे वार्षिक उत्पन्न 35 लाख 42 हजार इतके आहे. या दोघा पती-पत्नींवर एकही गुन्हा दाखल नाही. सुजय विखे यांच्याकडे केवळ 1 लाख 16 हजार 295 रुपयांची रोकड आहे. पत्नीकडे 1 लाख 37 हजार 485 रुपये रोकड आहे. सुजय यांच्याकडे 3 कोटी 65 लाख 23 हजार 468, तर पत्नीकडे 1 कोटी 90 लाख 91 हजार 617 रुपयांच्या बँक खात्यातील ठेवी आहेत. सुजय यांच्याकडे 5 लाख 71 हजार 300 रुपयांचे आणि पत्नीकडे 67 हजार रुपयांचे शेअर्स गुंतवणूक आहेत. विखे यांची 16 लाख 65 हजार रुपयांची, तर पत्नीकडे 5 लाख 85 हजार रुपयांची विमा पॉलीसी आहे.