खासदार असावा तर असा- डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर मतदारसंघातून स्तुतीसुमने

मुंबई/प्राजक्त झावरे-पाटील : सध्याच्या परिस्थितीत राजकारणी व राजकारणावरील लोकांचा विश्वास खूप कमी होताना दिसून येत आहे. गणपतराव देशमुख यांच्या सारख्या धुरंदर आणि खऱ्या कार्यसम्राट राजकारण्याकडे पाहताना ह्या विश्वासाला आशेचा किरण दिसत असतो. सध्या असेच काही मोजकेच चेहरे हा आशेचा किरण आपल्याला दाखवत आहेत. या चेहऱ्यांमध्ये कल्याणचे युवा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची छबी उजवी असल्याचे जनमानसात बोलले जात आहे. कार्यतत्पर ही त्यांची ओळख आता मतदारसंघात सर्वदूर पसरली आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पालकमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मेहनतीच्या, कामाच्या आणि शिवसैनिकांच्या कष्टाच्या जोरावर नवखे डॉक्टर श्रीकांत प्रचंड मोठया मताधिक्याने खासदार झाले. त्यांचा सुशिक्षित आणि नवा-कोरा चेहरा मतदारांना भावला.

खासदार झाल्यानंतर मात्र या नवख्या खासदाराने स्वतःच्या हिमतीवर घेतलेली भरारी, स्वतःची कार्यतत्पर म्हणून मिळवलेली ओळख, समाजाशी एकरूप झालेली त्यांची आपल्या माणसाची छबी, तरुणाईचा ठेका लक्षात धरून भरवले उत्स, क्रीडा स्पर्धा, तसेच महाआरोग्य शिबीर, रोजगार मेळावे सगळंच कमालीचं आहे. इतक्या कमी कालावधीत स्वतःची प्रतिमा त्यांनी लोकप्रिय बनवली.

घराणेशाहीचा त्यांच्यावर बसलेला शिक्का त्यांनी आपल्या कामातून आपल्या हिमतीवर मिटवला, हे राजकीय विरोधक सुद्धा मान्य करतात. नेवाळीच्या परिसरातील टेकडीवर केलेली लाखोंची वृक्षमेढ, अंबरनाथ मंदिर परिसरचा केलेला कायापालट, नागाव, दहिसर या पट्ट्यात रस्ते शाळेंसाहित उभे केलेल्या प्राथमिक सोई-सुविधा, दिवा पट्ट्याला रस्ते, रेल्वे, उड्डाण पूल यांच्या माध्यमातून दिलेला विकासमय प्रकाश, ठाकुर्ली स्थानकाचा विकास तसेच इतर स्थानकांवर केलेली कामे, अंबरनाथ परिसरातील विविध खेळांची मैदाने अशी अजून खूप मोठी यादीच होईल इतकी मोठी कामे त्यांनी आपल्या या अल्पावधीतच मार्गी लावली.

कामाच्या बाबतीत त्यांचा हातखंडा मोठा आहे परंतु त्यापेक्षाही लोकांना मध्ये अगदी सहज मिसळणारा, सहज उपलब्ध होणारा खासदार म्हणून त्यांची प्रतिमा लोकांना भावत आहे. मतदारसंघातील प्रत्येक तरुण-तरुणींच्या पसंतीचा हा खासदार असल्याचं तरुण वर्गातून नेहमीच चर्चिले जात आहे.

एकंदरीत समाजाची नस अगदी व्यवस्थित सापडलेला एक प्रामाणिक राजकारणी डॉक्टर म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. राजकारणातील नव्या पिढीतील प्रामाणिक व आश्वासक चेहरा म्हणून मतदारसंघावर त्यांनी मिळवलेली पकड आवाक करणारी आहे. त्यामुळे सर्व मतदारसंघात ‘खासदार असावा तर असा’ अशी भावना वर्तवली जाऊ लागली आहे.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे ठरले बेस्ट युथ लीडर…!