पवनराजे निंबाळकर खून प्रकरणी डॉ. पद्मसिंह पाटील न्यायालयात हजर

Dr. Padmasinha Patil

उस्मानाबाद : महाराष्ट्राचे माजी मंत्री पद्मसिंह पाटील हे पवनराजे निंबाळकर व समद शेख या दुहेरी खून खटल्यात मुंबई सत्र न्यायालयात हजर झाले आहेत. यावेळी माफीचा साक्षीदार असलेल्या आरोपी क्रमांक चार पारसमल जैन याने डॉक्टर पद्मसिंह पाटील यांची ओळख न्यायालयास पटवून दिली आहे. त्यामुळे डॉ. पाटील यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

पवनराजे निंबाळकर व समद शेख या दुहेरी खून प्रकरणी डॉ. पद्मसिंह पाटिल हे न्यायालयात हजर झाले होते. प्रकरणात आरोपी क्रमांक चार पारसमल जैन याने यापूर्वीच न्यायालयाकडे माफीचा साक्षीदार होण्यासाठी न्यायालयात विनंती अर्ज केला होता. हा अर्ज मंजूर झाल्यानंतर मागील महिन्यापासून माफीचा साक्षीदार पारसमल जैन यांची साक्ष न्यायालयात नोंदणी चालू होती. त्यावेळी त्याने पवनराजे निंबाळकर यांचा खून केल्याचे कबूल करून सदर कटात डॉक्टर पद्मसिंह पाटील, सतीश मंदाडे, मोहन शुक्ला इत्यादी आरोपी यांचे संबंध त्याच्यासोबत कसे आले होते हे कोर्टासमोर सांगितलं. तसेच सदर केसमध्ये खूना संदर्भात झालेला घटनाक्रम जशास तसा कोर्टासमोर उलगडून सांगितला. त्यानंतर सदर साक्ष नोंदविण्याच्या शेवटच्या भागात सदर पारसमल जैन यांच्याशी ज्या आरोपींचा संबंध आला. त्यांची ओळख पटवण्यासाठी मागील तारखेस डॉक्टर पद्मसिंह पाटील वगळता इतर आरोपींची ओळख न्यायालयास पटवून दिली होती. त्यावेळी डॉक्टर पद्मसिंह पाटील हजर नव्हते म्हणून न्यायालयाने आज १३ ऑक्टोबर रोजी डॉक्टर पद्मसिंह पाटील यांना न्यायालयात हजर राहण्याबाबत आदेश दिले होते.

त्यानुसार डॉक्टर पद्मसिंह पाटील न्यायालयात हजर झाले असता आरोपी पारसमल जैन याने डॉक्टर पद्मसिंह पाटील यांची ओळख न्यायालयास पटवून दिली व सदर माफीचा साक्षीदार आरोपी पारसमल जैन यांची सीबीआयच्या वतीने तपासाची साक्ष नोंदणी संपली. माफीचा साक्षीदार पारसमल जैन याचा उलट तपास आरोपींच्या वतीने घेण्यासाठी न्यायालयाकडून २६ ऑक्टोबर ही नवीन तारीख दिली आहे. सदर प्रकरणात सीबीआयच्या वतीने विशेष सरकारी वकील एजाज खान प्रकरणातील फिर्यादी निंबाळकर कुटुंबियांच्या वतीने ॲड. पांडुरंग गवाड व ॲड. रमेश मुंढे हे काम पाहत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या