माजी मंत्री तथा विधानसभा सदस्य डॉ. पतंगराव कदम यांना विधानसभेत आदरांजली

मुंबई, दि. 12 : राज्याचे माजी मंत्री विधानसभा सदस्य व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनाबद्दल विधानसभेत शोक प्रस्तावाच्या माध्यमातून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. दिवंगत सदस्यांच्या आठवणींना उजाळा देतानाच काही सदस्य भावूक झाले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या शोकप्रस्तावावर विधानसभा अध्यक्ष तसेच सदस्यांनी दिवंगत नेत्यांप्रती असलेल्या सहवेदना व्यक्त केल्या.

डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे म्हणाले, डॉ. कदम हे अभ्यासू, उत्तम प्रशासक, उत्कृष्ट संसदपटू, कार्यक्षम लोकप्रतिनिधी असे व्यक्तिमत्व होते. वकृत्व, नेतृत्व, कतृत्व या तीनही बाबीत त्यांनी आपला ठसा उमटवला. राज्यभरातील अनेक शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सहकारी संस्था, सांस्कृतिक क्षेत्राशी त्यांचा निकटचा संबंध होता. या सर्व क्षेत्रात त्यांनी अमूल्य योगदान दिले.

डॉ. कदम यांनी शाळा, महाविद्यालये, अभियांत्रिकी, वैद्यकीय आदी 180 हून अधिक शैक्षणिक शाखा सुरु केल्या. शून्यातून सुरुवात करुन भारती विद्यापीठाची स्थापना केली व ते नावारुपाला आणले. सर्वसामान्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय करण्याचे मोठे कार्य करण्यासह अनेक गरीब विद्यार्थ्यांना आपल्या संस्थांमध्ये मोफत शिक्षण दिले. आपल्या मंत्रीपदाच्या कालावधीत त्यांनी अनेक लोकोपयोगी कामे केली. ते जनमानसातील लोकप्रिय नेते होते.

शोकभावना व्यक्त करताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, ज्या व्यक्ती शुन्यातून स्वत:च्या कर्तृत्वाने मोठे होतात. अशा व्यक्ती जेव्हा समाजातून निघून जातात तेव्हा मोठी पोकळी निर्माण होते. विधानसभा सदस्य व माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनाने वैयक्तिकदृष्ट्या मोठी हानी झाली असल्याची भावना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी विधानसभेत व्यक्त केली.

मुख्यमंत्री म्हणाले, डॉ. कदम हे अभ्यासू, उत्तम प्रशासक, उत्कृष्ट संसदपटू, कार्यक्षम लोकप्रतिनिधी, उत्तम संघटक तसेच वक्तृत्व, नेतृत्व व कर्तृत्व या तिन्ही गुणांचा संगम असणारे जनमाणसातील लोकप्रिय नेते होते. लाखो विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे फार मोठे कार्य त्यांनी केले. प्रगत शैक्षणिक संकल्पना जाणून त्याचा आपल्या शैक्षणिक संस्थामध्ये कृतीशील अवलंब करण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. ते ख-या अर्थाने प्रयोगशील शिक्षणतज्ज्ञ होते.

गरीब विद्यार्थ्यांना मदत करण्याबरोबर पत्रकार, समाजसेवक, कलाकारांना मानधन देण्याची योजना त्यांनी सुरू केली. विविध संस्थांचे सदस्य, अध्यक्ष, विश्वस्त, व्यवस्थापक, संचालक ही विविध पदे उत्तम कार्यासहीत त्यांनी भुषविली आहेत. विविध सहकारी संस्था त्यांनी स्थापन केल्या.

गेल्या चार वर्षात माजी मंत्री सांगली जिल्ह्यातील आर.आर.पाटील आणि डॉ. पतंगराव कदम हे उमदे नेतृत्व हरपले आहे. ज्यांनी आपल्या कर्तृत्वातून शुन्यातून आयुष्य घडवले असे स्व. गोपीनाथ मुंडे, आर. आर. पाटील, विलासराव देशमुख, डॉ. पतंगराव कदम, वसंत डावखरे असे महाराष्ट्राचे सामान्यातील नेतृत्व हरपणे म्हणजेच राज्यात पोकळी निर्माण झाल्याची भावना मुख्यमंत्री यांनी व्यक्त केली.

सांगली जिल्ह्यातून पलुस-कडेगाव मतदारसंघातून ते सहा वेळा महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते. महत्वाच्या खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी उत्तम काम केले. सहका-यांशी आणि अधिका-यांशी त्यांचे मैत्रीचे आणि कौंटुबिक संबंध होते.

मुख्यमंत्री म्हणाले, सामान्य शिक्षक म्हणून आयुष्याचा प्रवास सुरू केलेल्या पतंगरावांच्या नावापुढे कुलपती पद लागले. त्यांनी ज्या ज्या क्षेत्रात काम करण्याची उर्मी बाळगली त्यात ते यशस्वी झाले. सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कार्याला व्यापक आयाम दिला होता.

सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्याच्या सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील उमद्या नेत्याला महाराष्ट्र मुकला आहे. डॉ. कदम यांनी ग्रामीण भागातील मुला मुलींना शिक्षणाचे द्वार खुले करण्याचे काम केले.

सहकार मंत्री सुभाष देशमुख यावेळी म्हणाले, वयाच्या विसाव्या वर्षी विद्यापीठ सुरु करण्याचा धाडसी निर्णय पतंगरावांनी घेतला. ते एक आगळ वेगळ व्यक्तीमत्व होत.

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यावेळी म्हणाले, पतंगरावांच्या निधनामुळे मार्गदर्शक नेत्याला गमावले आहे. शिक्षण, सहकार, राजकारणात त्यांनी आपला ठसा उमटवला. ते पितृतुल्य व्यक्तीमत्व असल्याचा उल्लेख करताना श्री. विखे पाटील भावनाविवश झाले होते.

सदस्य अजित पवार यांनी सांगितले, राजकीय, शैक्षणिक पार्श्वभुमी नसलेल्या डॉ.कदम यांनी भारती विद्यापीठाच्या माध्यमातून देशात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनिय काम केले. जागतिकस्तरावर देखील या संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाचे काम केले.

जेष्ठ सदस्य गणपतराव देशमुख यांनी सांगितले, डॉ. कदम स्थापन केलेल्या भारती विद्यापिठाच्या माध्यमातून राज्यातच नव्हे तर दुबई, अमेरिका येथे शिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन दिली. ते प्रभावी समाजसेवक व राजकारणी होते.

यावेळी भावना व्यक्त करताना सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी दिवंगत डॉ. कदम यांच्या आठवणींना उजाळा देत कुंडल येथील वन अकादमीला पतंगरावांचे नाव देण्याची मागणी केली. तर सदस्य जयंत पाटील यांनी पतंगरावांच्या कारर्कीदीचा आढावा घेतानाच पतंगरांवाना झालेल्या कर्करोगाचा उल्लेख करीत सभागृहामध्ये या आजारावर चर्चा घडवून आणली पाहिजे. आपली जिवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी, भाजीपाला तसचे पिकांवर फवारणी केले जाणारे किटकनाशके यावर सखोल चर्चा होण्याची मागणी त्यांनी केली.

दिलीप वळसे- पाटील म्हणाले, डॉ. कदम हे सामान्य परिस्थितीतून कष्टाने, जिद्दीने अतिशय उच्च स्थानापर्यंत पोहोचले. आपल्या मंत्रीपदाचा उपयोग सामान्यांसाठी व्हावा हा त्यांचा ध्यास असायचा. मंत्रीमंडळ बैठकीत सर्वसामान्यांच्या हिताचा निर्णय झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी होण्यास अजिबात विलंब लागता कामा नये ही त्यांची भूमिका होती.

यावेळी सदस्य सर्वश्री शिवाजीराव नाईक, अमित देशमुख, शरद सोनवणे, चंद्रदीप नरके, जयकुमार गोरे, चैनसुख संचेती, गोपालदास अग्रवाल, प्रशांत ठाकूर, सुनील केदार, विलासराव जगताप, संग्राम थोपटे, आर. टी. देशमुख, अनिल कदम, उल्हास पाटील, डॉ. सुजीत मिनचेकर, सुभाष पाटील, श्रीमती संध्यादेवी कुपेकर, श्रीमती दीपिका चव्हाण आदींनी शोकभावना व्यक्त केल्या.