जेंव्हा डॉ मेधा खोलेंच्या तक्रारीची गणपती बाप्पाच चौकशी करतात. . .

मयूर गलांडे : हवामान खात्याच्या डॉ मेधा खोले यांच्या सिंहगड पोलीस ठाण्यातील तक्रारीची दखल स्वत: गणपती बाप्पानचं घेतली. पुण्यातील सर्वच मानाच्या बाप्पांची बैठक जमली. या सर्व बाप्पांनी खोलेबाईंच्या भुर्सटलेल्या वैचारीक खोलीचा वाद सोडविण्यासाठी एक समिती गठित केली. विशेष म्हणजे समितीकडून श्रीमंत दगडूशेठ गणपतीला या समितीच अध्यक्ष बनवण्यात आले. तसेच याप्रकरणी त्यांनी सर्व चौकशी करून अहवाल आणि पोलिस तपास पाहून खटला निकाली काढायचे ठरवले.

याप्रकरणी, ज्या गणपतीसाठी खोलेबाईंनी सोवळं केलं. त्या गणपतीची साक्ष घेतली असता, आपल्याला काहीच प्रोब्लेम नाही. उलट मला स्वादिष्ट अन् ‘निर्मल’ मोदक खायला मिळाले. यादवताईंचे जेवण तर एकच नंबर होते. अजूनही जिभेवर चव रेंगाळत असल्याचं खोलेताईंच्या घरातील ‘सोवळ्यातील’ गणपती बाप्पानं म्हटले. तसेच याप्रकरणात गौरींच्याही साक्ष घेण्यात आल्या. त्यावेळी गौरींनेही स्वयंपाक चविष्ट आणि निर्मल होता. आम्हाला तर गणेशासोबत 10 दिवस रोजच तो स्वयंपाक खायची इच्छा होती. पण, खोलेताईंनी तीनच दिवसात आम्हाला हाकलून लावले, असे गौरींनी म्हटले.

त्यानंतर, न्यायमूर्ती श्रीमंत दगडूशेठ यांनी खोलेताईंना विचारणा केली. त्यावेळी ‘खोलेताईंच्या विचारांच्या खोलीचा अंदाज’ आल्याने बाप्पालाही थोडावेळ मागास असल्यासारखचं वाटलं.

डॉ. खोलेताईंनी 1 वर्षात 4 वेळा निर्मल स्वयंपाक खाल्ला. चविष्ट आणि स्वादिष्ट भोजन खाताना खोलेबाईंच्या मनात निर्मल विचार होते. मात्र, जेव्हा त्यांना यादवबाईंची जात कळाली तेव्हा प्रलय आला, भूकंप झाला, धरणीमाय फाटायला लागली आणि गौरी गणपतीचा कोप झाला. देव बाटला, धर्म बाटला, जात बाटली, होतं नव्हत कमावलेलं सर्व ‘पुण्य’ मुळा-मुठात वाहून गेलं.

शेवटी न्यायमूर्तीं दगडूशेठांनी मेधाबाईंना प्रश्न केला – बाई, तुमच्या गौरी-गणपतीला त्यांच्या हातचा स्वयंपाक चालतो, ते कधीही त्यांच्या स्पर्शाने बाटले नाहीत. त्यांना कधीही त्यांच्या जातीचा प्रश्न पडला नाही, मग ही ‘जात का जात नाही’…….?

वरील लेख हा सध्या सुरु असणाऱ्या वादावर मिश्कील टिप्पणी करणारा असून आमचा कोणाच्याही भावना दुखावण्याच्या उद्देश नाही