fbpx

सोलापूर लोकसभा: डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या नावावर शिक्कामोर्तब !

सोलापूर- सोलापूर लोकसभेसाठी भाजपचे उमेदवार कोण या चर्चेला आता लवकरच पूर्णविराम मिळणार आहे. महाराष्ट्राच्या भाजपच्या कोअर कमिटीकडून गौडगाव मठाचे मठाधिपती डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांचे नाव फायनल करून केंद्रीय कमिटीकडे पाठवून दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. येत्या दोन दिवसात सोलापूर लोकसभेचे भाजपचे उमेदवार म्हणून डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या नावाची घोषणा होणार असल्याचे समजते.
पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि माजी मंत्री व लिंगायत समाजाचे बडे प्रस्थ म्हणून ओळखले जाणारे माजी मंत्री विनय कोरे यांनी यासाठी लीड घेतला आहे. त्यामुळे सोलापूर लोकसभेसाठी आता काँग्रेसचे उमेदवार व माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आणि भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्यात काट्याची लढत होणार असल्याची जोरदार चर्चा सोलापूरच्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान खासदार शरद बनसोडे यांच्याविषयी सोलापूरकर जनतेत प्रचंड असल्याने आणि नेत्यांनीसुद्धा वरिष्ठांकडे तसे कळविल्याने भाजपचा नवीन उमेदवार कोण याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी राज्यसभेचे खासदार अमर साबळे तर पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांचे नाव मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्याकडे सुचविले होते.
खासदार साबळे हे उपरे असल्याने त्यांचे नाव मागे पडले,तर कोल्हापूरचे माजी मंत्री व सोलापूरचे जावई विनय कोरे आणि पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी महास्वामींसाठी फिल्डिंग लावली होती. तसेच महास्वामींच्या उमेदवारीसाठी मठाधिपतींच्या एका शिष्टमंडळाने फडणवीस यांची भेट घेऊन महास्वामी यांना उमेदवारीची मागणी केली होती. त्यावेळी सोलापूर लोकसभेसाठी आपण महास्वामींसाठी सकारात्मक असून कामाला लागा असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिष्टमंडळाला सांगितले होते. त्यानंतर शुक्रवारी महाराष्ट्राच्या भाजपच्या कोअर कमिटीकडून महास्वामींचे नाव फायनल करून दिल्लीला धाडण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे .

1 Comment

Click here to post a comment