fbpx

डॉ. शिवाजीराव निलंगेकरांचा खरा वारसदार मीच – अशोकराव पाटील निलंगेकर

टीम महाराष्ट्र देशाः (प्रा.प्रदीप मुरमे ) काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी मुख्यमंञी डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा खरा राजकीय वारसदार आपणच आहोत असा दावा करुन डॉ.निलंगेकर यांचे सुपुञ तथा काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांनी नात्याने पुतणे असलेले राज्याचे कामगारमंञी संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्यावर आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार निशाणा साधला.

निलंगा(जि.लातूर) येथील बँक काँलनीत जनसंपर्क सभेचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष प्रा.राजेंद्र सुर्यवंशी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

अशोकराव पाटील म्हणाले की, मागील विधानसभा निवडणूकीत आपण नवखा असेल, आपल्या हातून काही चुकलं असेल. आपण कुठेतरी कमी पडलो. मग ते संपर्क असेल अथवा आणखी काही. त्यामुळे आपल्याला पराभवाला सामोरे जावे लागले. जनतेनी दिलेला तो कौल आपण आपण मोठ्या मनाने मान्य केला. परंतु त्या अपयशाने आपण कदापि खचलो नाही. यश-अपयशाला जीवनात सामोरे जावे लागते. म्हणून मी निराश न होता सातत्याने मतदारसंघातील जनतेच्या संपर्कात असून त्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे.

आभियांञीकीचा पदवीधर असतानाही केवळ वडीलांच्या आग्रहामुळे आपण अपघाताने राजकारणात आलो. माझे अनेक वर्ग मिञ आज मोठ्या पदावर शासकीय सेवेत कार्यरत आहेत. आपली राजकारणातील आजची अवस्था माञ ‘राजकारण धड सोडता येत नाही अन् पळून देखील जाता येत नाही’ अशी झाली आहे.आपल्या २६-२७ वर्षाच्या राजकीय कारकीर्दीमध्ये आपण विविध पदे भूषविली. या विविध पदाच्या माध्यमातून या भागाचा विकास व सामान्य जनतेच्या कामाची आपण मोठ्या प्रमाणावर सोडवणूक केली आहे. दादासाहेब हे आपले दैवत असून त्यांचा आदर्श समोर ठेवून आपण समाजकारणात व राजकारणात काम करत असल्याचे यावेळी अशोकराव पाटील निलंगेकर म्हणाले.

दादासाहेबांनी केलेला विकास व आपण केलेल्या कामाची पावती म्हणून या मतदारसंघाच्या उज्वल भवितव्यासाठी आगामी काळात आपल्याला काम करण्याची संधी द्या अशी भावनिक साद अशोकराव पाटील यांनी यावेळी उपस्थित जनतेला घातली.

1 Comment

Click here to post a comment