गडचिरोलीत दारूबंदीच्या कडक अंमलबजावणीसाठी डॉ. बंग यांचे राज्यपालांना साकडे

गडचिरोली : चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी कायम करावी व गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदीची अंमलबजावणी कडक करावी, अशी मागणी डॉ. अभय बंग यांनी केली. दारू ही आर्थिक विकास करणारी नव्हे तर व्यसन वाढवणारी आहे, असेही ते म्हणाले. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सोमवारी चातगाव येथे ‘सर्च’ संस्थेच्या शोधग्राम या मुख्यालयात सदिच्छा भेट दिली. त्यावेळी डॉ. बंग यांनी ही मागणी केली.

सर्च संस्थे द्वारा जिल्ह्यात सुरू असलेल्या दारू व तंबाखूमुक्तीच्या कामाची माहिती राज्यपालांना डॉ. बंग यांनी दिली. शोधग्राममध्ये कोश्यारी यांनी मॉं दंतेश्वरीच्या मंदिराला भेट देऊन पूजन केले व आदिवासी देवतांबाबत माहिती घेतली. तसेच काही रुग्णांसोबत राज्यपालांनी संवाद साधत उपचार सुविधेचीही माहिती जाणून घेतली.

यावेळी राज्यपाल म्हणाले, की डॉ. बंग यांच्या सर्च शोधग्राममधून सर्वांना प्रेरणा मिळते. येथे येण्याची, स्वत:च्या डोळ्यांनी हे काम बघण्याची माझी खूप दिवसांची इच्छा होती. दोन वर्षांपूर्वी मी गडचिरोलीत आलो होतो, परंतु वेळेअभावी येऊ शकलो नाही. जिथे शिकायला मिळते, प्रेरणा मिळते, अशा जागी मी जातो. याच हेतूने आज सर्चचे काम बघण्यासाठी आलो आहे. गडचिरोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त जनतेने कोरोना लस घ्यावी, यासाठी जनजागृती व सहकार्य करा, असे आवाहनही राज्यपालांनी केले.

महत्त्वाच्या बातम्या